नवी मुंबईतील शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा बंडाच्या तयारीत?

09 Oct 2024 15:36:21
 new mumbai
 
नवी मुंबई | एकाच कुटुंबाच्या पालख्या वाहण्याचे काम आमच्या माथी मारले जात असेल तर निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी योग्य तो निर्णय घ्यावा लागेल असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय नहाटा यांनी दिला आहे. येत्या दोन दिवसात माझी भुमीका जाहीर करेन असेही त्यांनी म्हटले आहे.
 
नहाटा हे शिंदेंची साथ सोडून तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या उमेदवारीचे आव्हान आहे. नाईक आणि म्हात्रे यांच्यापैकी नेमकी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा यांनादेखील बेलापूर मतदारसंघातुनच निवडणूक लढवायची आहे.
 
मात्र नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार हे लक्षात आल्यानंतर नाहटा यांनी बंडाची तयारी सुरु केली आहे. २०१४ मध्ये बेलापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुक लढवली होती. मंदा म्हात्रे, गणेश नाईक यांच्या सोबत झालेल्या तिरंगी लढतीत नहाटा यांचा चार हजार मतांनी पराभव झाला होता.
 
२०१९ मध्ये भाजप-शिवसेनेने विधानसभेची निवडणुक एकत्र लढवली होती. त्यावेळी इच्छा असूनही नहाटा यांना निवडणुक लढविता आली नव्हती. मात्र यावेळी त्यांनी तयारी केली आहे. शिवसेनेची पाळेमुळे खोलवर जावीत यासाठी गेली १५ वर्ष मी सातत्यपुर्ण काम केले आहे.
 
शहरातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. असे असताना आम्ही केवळ एकाच कुटुंबाच्या पालख्या वाहण्याचे काम करायचे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ऐरोली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तर बेलापूर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल असे बोलले जाते. त्यामुळे नहाटा यांनी थोरल्या पवारांची साथ धरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नहाटा यांनी त्यांची साथ धरली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0