देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील , राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाकीत

By Raigad Times    12-Nov-2024
Total Views |
MUMBAI
 
मुंबई | राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तवले आहे. आताच्या घडीला राजकीय आणि तांत्रिक सर्वोत्कृष्ट आकलन फडणवीस यांना असल्याचे सांगतानाच, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन मस्त असल्याचेही ते म्हणाले आहेत.झी २४ तास या वृत्त वाहिनीवर टू द पॉईंट मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे भाकीत वर्तवतानाच भाजप नेते अमित शहा यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे.
 
अमित शाहदेखील काही वेगळे सांगत असतील, असे नाही. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, पुढचे पुढे असे शहा यांनीच म्हटल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे तिकडून येथे आले असतील, असे मला वाटत नाही. आता भाजपाने त्यांना मुख्यमंत्र केले. पण त्यावेळीही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीसच होते. सरकार बसते तेव्हा ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचाच मुख्यमंत्री बसतो, असेही राज ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन मस्त आहे. तांत्रिकदृष्ट्या उत्तम आणि सढळ हाताने मदत करणारे हे समीकरण उत्तम आहे असेही त्यांनी सांगितले.
 
मला पटत नाहीत त्या गोष्टी एकनाथ शिंदेंकडून झाल्या असतील; पण तो माणूस दिलदार मनाचा, लोकांना मदत करणारा आहे. पुण्यातील मदतीचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. राजकारणात राजकीय माणूस कंजूस असून चालत नाही. त्याने सढळ हाताने मदत करावी लागते. त्यांच्याकडे ती वृत्ती आहे. ‘राजकारणात काही गोष्टींच्या सीमा आपण आखल्या पाहिजेत. हे मी सर्व राजकीय पक्षांसाठी बोलत आहे.
 
राजकीय नैतिकता नावाची गोष्ट असते की नाही? की आपल्याला सर्वच गुंडाळून टाकायचं?’ असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. दरम्यान, मनसेच्या मदतीने राज्यात भाजप युती सरकार येईल, असे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी टिव्ही ९ या वाहिनीवर बोलताना म्हटले आहे. भाजप आणि आघाडीचे सरकार यात माझा संबंध किंवा कन्फर्ट झोन पहिल्यापासून भाजपसोबत आहे. तो कधी लपवला नाही.
 
मी शिवसेनेत असताना दुसरा पक्ष समोर आला तो भाजप होता. वाजपेयी, अडवाणी, महाजन, गोपीनाथ मुंडे यांचा सहवास मिळाला. आमचे संबंध वाढले. नंतर फडणवीस आले, तावडे आले. त्यामुळे भाजपसोबत कन्फर्ट झोन आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.