महाआघाडी म्हणजे स्थगिती सरकार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाआघाडीवर जोरदार टिका

सावत्र भावापासून सावध रहा; देवाभाऊंचा लाडक्या बहिणींना सल्ला

By Raigad Times    13-Nov-2024
Total Views |
pen
 
पेण | महाआघाडीचे सरकार म्हणजे स्थगिती सरकार आणि महायुतीचे सरकार म्हणजे गती आणि प्रगतीचे सरकार आहे. त्यामुळे राज्याच्या, आपल्या भागाच्या प्रगतीसाठी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पेण येथे बोलत होते. महाविकास आघाडीच्या अडिच वर्षांच्या सत्ता काळात त्यांनी अनेक कामांना स्थगिती दिली, याची काही उदाहरणेही यांनी यावेळी दिली.
 
महायुतीचे उमेदवार भाजप आमदार रविंद्र पाटील यांच्या प्रचार सभेसाठी मंगळवारी, १२ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस पेणमध्ये आले होते. पेण शहरातील नगरपालिका मैदानावर झालेल्या या सभेला बारा हजारांपेक्षा जास्त संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा आणि गणेश मूर्तिकारांच्या प्रश्नाबाबतचा मुद्दा खासदार धैर्यशील पाटील यांनी उपस्थित केला होता. तोच धागा पकडत, फडणवीस यांनी पेणच्या मूर्तिकरांना निर्धास्त केले.
 
महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर बाळगंगा प्रकल्पग्रस्तांविषयी बैठक बोलावू, असेही त्यांनी सांगितले. पेण हे गणेशमूर्ती निर्मितीसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र पीओपीच्या गणेश मूर्तींवर काहीजणांनी आक्षेप घेतला आहे. पण तुम्ही निर्धास्त रहा, हा देवा भाऊ तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, मी जे बोलतो ते पूर्ण करतो. हा विषय केंद्र सरकाराच्या माध्यमातून कायमचा संपवून टाकतो, असा शब्द फडणवीस यांनी मूर्तिकारांना दिला.
 
पेणच्या गणेशमूर्तींना देश-विदेशात मोठी मागणी आहे. मूर्ती कलेचा हा व्यवसाय आता एक हजार कोटींच्या घरात जाऊन पोहचला आहे. या उद्योग नगरीत लक्ष्मीची पावले सदासर्वकाळ पडतील, हा विषय केंद्र सरकाराच्या माध्यमातून कायमचा संपवून टाकतो, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणीसांच्या या आश्वासनानंतर बाराशे कारखाने व दीड हजार स्थानिकांचा रोजगार कायमचा सुटण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.
 
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरदेखील टिका करताना, महाआघाडीच्या नेत्यांना सावत्र भाऊ ही उपाधी दिली आहे. लाडक्या बहिणीमुळे सावत्रभाऊ सैरभैर झाले आहेत. राज्यातील २.५० कोटी बहिणींच्या खात्यात थेट नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे जमा झाले आहेत. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येत असून या बहिणींच्या खात्यात २१०० रुपये दर महिन्याला दिले जाणार असल्याचा पुर्नरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
 
पेण विधानसभा मतदारसंघात ४० हजार लाभार्थी लाडक्या बहिणी असून त्यांना दर महिन्याला ५५ कोटी रुपये महायुतीचे सरकार देते. आता मला सांगा, या बहिणी आमच्या प्रेमापोटी लाडक्या देवा भाऊला भेटायला आल्यात. यांच्या येण्याने सावत्रभाऊ बिथरले आहेत. पेणच्या जनतेने २०१९ विधानसभा निवडणुकीत रविंद्र पाटील यांना २४ हजार मतांची आघाडी दिली. लोकसभा निवडणुकीतदोन पाटील एकत्र भाजपमध्ये आल्याने एप्रिल २०२४ लोकसभेला महायुतीचे खासदार सुनील तटकरे यांना डबल इंजिनमुळे ५० हजारांच्या मताधिक्याने प्रचंड पाठबळ मिळाले.
 
आता जनतेच्या दरबारात रविंद्र पाटील यांना कमळाचे ३ नंबरचे बटन दाबून विजयी कराल, हे मी सांगण्याची गरज नाही. याशिवाय पेणच्या विकासासाठी मोठा विकासनिधी दिल्याचे ते म्हणाले. पेण शहराच्या पाणी योजनेसाठी १६५ कोटी, शहरातील रस्ते यासाठी ५० कोटी महायुती सरकारने दिले.
 
बाळगंगा विस्थापितांसाठीविषेश सहकार्य, शेतकर्‍यांच्या प्रकल्पामध्ये संपादीत केल्या जाणार्‍या जमिनींना चालू रेडीरेकनर प्रमाणे भाव, शेतकर्‍यांची कर्जमाफी केली जाईल, अशा विविध विषयांबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचे सूतोवाचही त्यांनी भाषणात केले. यावेळी खा. सुनील तटकरे, मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार धैर्यशील पाटील, आ. रविंद्र पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे समन्वय सतीश धारप, शिंदे गटाचे प्रकाश देसाई आणि अ‍ॅड. महेश मोहीते, प्रितम पाटील यांची जोरदार भाषणे झाली.