भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

17 Nov 2024 16:31:21
 pimpri
 
पिंपरी | अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने आणीबाणी लावली. राज्य घटनेच्या धज्जिया उडविल्या. अनेकदा स्वार्थासाठी घटनेत बदल केला. जनता पार्टीच्या सरकारने १९७७ मध्ये काँग्रेसने मोडतोड केलेल्या दुरूस्त्या रद्द केल्या. ज्यांनी राज्यघटना तोडण्याचे पाप केले, तेच लोक आता हातात घटना घेऊन जहरी आणि खोटा प्रचार करत असल्याची टीका केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
 
भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चिंचवडचे भाजप उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ वाकड येथील आयोजित सभेत गडकरी बोलत होते. आमदार अिेशनी जगताप, उमा खापरे, अमित गोरखे यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान जातीवाद आणि सांप्रदियकतेचे जहर कालविण्यात आले. भाजप राज्यघटना बदलणार असा खोटा प्रचार विरोधकांनी केला.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना भाजप कधीच बदलणार नाही आणि कोणाला बदलूही देणार नाही, असे सांगून गडकरी म्हणाले, काँग्रेसने २०, ४०, ८, ५ कलमी अशा खूप कार्यक्रमाच्या घोषणा दिल्या. गरिबी हटवचा नारा दिला मात्र, दलित, मुस्लीम, शेतमजूर, शेतकरी यांची गरिबी हटली नाही. केवळ काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली. सामान्य माणसांची हटली नाही. ७५ वर्षात ६० वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचे राज्य होते. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचे नुकसान झाले.
 
देशाचे भवितव्य बदलण्यासाठी योग्य निती, नेतृव,पक्षाची निवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले. देशात पैशांची कमी नाही, देशासाठी प्रामाणिकपणे काम करणा- या नेत्यांची कमी आहे. जगात सर्वाधिक हुशार आणि युवा अभियंते आपल्या भारतात आहेत. त्यामुळे आपला देशात विेशगुरू होण्याची क्षमता आहे.
 
दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडीचा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. पुण्यात ८० हजार कोटी रूपयांचे उड्डाणपुल बांधण्यास मान्यता दिल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0