टेम्पोची ट्रकला धडक; केबिन दबल्याने चालक जखमी , मुंबई-पुणे एसप्रेस वेवर दुर्घटना

17 Nov 2024 18:45:30
 khopoli
 
खोपोली | मुंबई-पुणे एसप्रेस वेवर शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) टेम्पोने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाला. अपघातात टेम्पोची केबिन दबल्याने चालक अडकून पडला होता. क्रेनच्या मदतीने वाहने बाजूला करुन चालकाला बाहेर काढण्यात आले.
 
शुक्रवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई लेनवर किमी ४०.१०० दरम्यान ही दुर्घटना घडली. पुणेहुन मुंबईकडे जाणार्‍या टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पोने पाठीमागून समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोची केबिन दबल्याने चालक वरील चालक अफसर अली खान (वय २८, रा. मुंबई) त्या केबिनमध्ये अडकून पडला होता.
 
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या सर्वांनी मिळून दोन क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करून केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. चालकाचे दोन्ही पाय फ्रॅचर होऊन तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी एमजीएम कामोठे पनवेल येथे रवाना करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
 
 
Powered By Sangraha 9.0