म्हसळा | देशाच्या संसदेत २५० जागांची गरज असताना नरेंद्र मोदी यांनी केवळ संविधान बदलण्यासाठी ४०० पारचा नारा देऊन देशातील जनतेची दिशाभूल केली असून, त्यांचा संविधान बदलण्याचा नारा गेला कुठे? असा सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात बदल करणारा अजून जन्माला यायचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
श्रीवर्धन मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी, १६ नोव्हेंबर रोजी म्हसळा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवार बोलत होते. एवढे वर्षे सत्ता भोगून बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून न देणार्या नेत्यांना नाव न घेता चपराक दिली. महाराष्ट्र तरुणांनी चालवायचा आहे.
तरुणांना संधी देणे अत्यावश्यक असून अनिल नवगणे काळजी करु नका, कोणीही आडवा आला तरी विजय तुमचाच आहे श्रीवर्धन मतदार संघातील जनता तुमच्या पाठीशी खंबीर आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. तुम्ही फक्त अनिल नवगणे यांना निवडून द्या, पुढची जबाबदारी माझी असल्याचे सांगून महाराष्ट्रात पुढचा काळ हा महाविकास आघाडीचाच असेल, असा ठाम विेशास शरद पवार यांनी व्यक्त केला. मला विधानसभेवर पाठवा.
या मतदार संघातील एकही तरुण बेरोजगार राहणार नाही. बेरोजगार तरुणाला त्याच्या योग्यतेनुसार रोजगार देण्यासाठी आम्ही बांधील असल्याचे सांगून फक्त एकदा ही संधी मला द्या, असे आवाहन उमेदवार अनिल नवगणे यांनी केले. या सभेला श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष वैभव तोडणकर, म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष अझर धनसे, शाम भोकरे, शिवसेना म्हसळा तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर, क्षेत्र संघटक रविंद्र लाड, अविनाश कोळंबेकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती ज्ञानदेव पवार, नदीम परदेशी आदी मान्यवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.