आम्हाला कोणी निष्ठा शिकवू नये , शिवसेना युवा नेते विकास गोगावले यांनी फटकारले

18 Nov 2024 19:22:38
 mhad
 
महाड | आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगणार्‍यांनी आपल्या नेत्याचा विश्वासघात केला, त्यावेळी यांच्या फ्लॅटच्या खाली जगताप आणि त्यांच्या समर्थकांनी धिंगाणा घालून थयथयाट केला होता हे लक्षात ठेवावे. आम्ही स्वतःहून भांडणे केलीत, असा एक तरी प्रसंग दाखवा, आता विरोधकांनी आमची वाट वाकडी केली आहे. त्यांना रस्ता दाखवणार, असा सूचक इशारा गोगावले यांनी दिला.
 
महायुतीचे उमेदवार आ.भरत गोगावले यांची महाड शहरात कॉर्नर सभा सरेकर आळी येथे आयोजित केली होती. यावेळी विकास गोगावले बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे उपजिल्हा प्रमुख बिपीन म्हामुणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काका वैष्णव, महम्मदअली पल्लवकर, मेहबुब कडवेकर, डॉ. जोगळेकर, सेनेचे प्रवक्ते नितीन पावले, शहर प्रमुख डॉ. सुर्वे, सिध्देश पाटेकर, निलेश तळवटकर, श्रीप्रकाश उर्फ दादा कदम, राकेश वाघ आदी उपस्थित होते.
 
mhad
 
महाड एमआयडीसीत रोजगार नाही अशी टिका करणारे, एमआयडीसीत धंदे करून हे लाखो रुपये कमावित आहेत. गेल्या १५ वर्षात आम्ही कधी यांचे काम बंद करा म्हणून त्रास दिला नाही; पण २३ तारखेनंतर ज्यांनी ज्यांनी आम्हाला छळलेय त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा युवा सेना राज्य कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी महाड सरेकर आळी येथील कॉर्नर सभेत दिला. जनतेने त्यांना ५ वर्षे संधी दिली होती; मात्र संधीचे सोने करण्याऐवजी स्वतःचे गळे सोन्याने भरले. आम्ही विकास केला नाही, असा आरोप करणार्‍यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात काहीही विकास केला नाही.
 
व्यापारी, कष्टकरी यांची दुकाने, टपर्‍यांवर बुलडोझर फिरवला. हेमहाडकरांनी विसरू नये. गोगावले कुटुंब वर्षाचे १२ महिने जनतेच्या सेवेसाठी बाहेर पडलेले असते; मात्र जनतेने ज्यांना इतक्या वर्षात कधी पाहिले नाही, ते जगताप कुटुंबीय या निवडणुकीत दिसत आहेत, असा टोला लगावला.
 
काका वैष्णव यांनी विरोधकांच्या जाहीरनाम्याचे वाचन करीत त्याची चिरफाड केली. कुठल्याही अन्य लोकप्रतिनिधीने आणला नाही इतका ३५० कोटींचा निधी आ. गोगावले यांनी महाडसाठी आणला, हे नाकारता येणार नाही. महाडचे खरे शिल्पकार स्व. अण्णासाहेबसावंत आहेत.
 
त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. त्यांचे नांव पालिकेच्या नव्या इमारतीमधील कौन्सिल हॉलला द्यावे ही नगरसेवक अगरवाल यांची मागणी विरोधकांनी धुडकावली होती.महायुतीची सत्ता पालिकेत येताच स्व.अण्णांचे नाव या हॉलला सन्मानाने दिले जाईल, अशी ग्वाही दिली. स्व. अण्णांनी जो निधी साठवला होता त्या निधीतून विरोधकांनी पालिकेची इमारत उभी केली, असा आरोप केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0