महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे , उरणमध्ये मनोहर भोईर यांना निवडून द्या

शिवसेना नेते संजय राऊत यांचे आवाहन

By Raigad Times    18-Nov-2024
Total Views |
uran
 
उरण | ही लढाई नुसती उरणची नाही, तर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातले कार्यकर्ते लढले आहेत. या लढ्यात आगरी समाजाच्या कार्यकर्त्यांचे योगदान आहे. आपल्या हक्काचा उमेदवार मनोहर भोईर यांना विधानसभेत पाठवा. त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे संजय राऊत यांनी केले आहे.
 
उरण येथे महाविकास आघाडीचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मनोहर भोईर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (१६ नोव्हेंबर) रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत केले. यापुढे बोलताना संजय राऊत यांनी, आपल्या महाविकास आघाडीच्या विजयासाठी एक एक आमदार महत्त्वाचा आहे. त्यासाठी मनोहर भोईर यांची हक्काची ही उरणची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायची आहे. हा आवाज विधानसभेत जायला पाहिजे.
 
हा आवाज भूमिपुत्रांचा आवाज आहे. महाराष्ट्रामध्ये उरणच्या भूमीतून हा आवाज गर्जत राहिला पाहिजे. आपल्याला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. येथील रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. आपल्या राज्याचा विकास झाला. या भागाचा विकास नाही. इथे बेरोजगारांच्या फौजा वाढत आहेत. महाराष्ट्रातले उद्योग एकापाठोपाठ गुजरातला घेऊन जात आहेत. त्यामुळे आमच्या बायका, मुलांनी, तरुणांनी, बेरोजगारांनी नुसते हात चोळत बसायचे.
 
अशा प्रकारचे काम राज्यामध्ये सुरू आहे. या आमच्या शेतकर्‍यांच्या जमिनीवर तिसरी मुंबई उभी राहणार आहे. पहिली, दुसरी आणि आता तिसरी मुंबई इथे होणार आहे. १२४ गावांवर हे संकट येत आहे. भविष्यात आपल्या या शेतजमिनी आपल्या राहणार नाहीत.
 
असे संकट येथे तिसर्‍या मुंबईच्या रुपाने येणार आहे आणि इथल्या भूमिपुत्रांवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे जे झाले, तेच इथे उरणपासून अलिबागपर्यंत होणार आहे. आमच्या भूमिपुत्रांना सुखाने जगू द्यायचे नाही. त्यांच्या जमिनी हिसकावून घ्यायच्या, त्यांचे न्याय, हक्काची कामे, अधिकार हिसकावून घ्यायचे, त्यांना बेरोजगार करायचे, आणि त्यांनी संघर्ष आंदोलने केली की, त्यांच्या अंगावर गोळ्या घालायच्या.
 
त्यांना तुरुंगात टाकायचे. अशा प्रकारचे काम या राज्यात चालू आहे. कधीकाळी अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला हा तालुका आणि जिल्हा आहे. महाराष्ट्रात महिलांसाठी प्रवास फुकट. बेराजगार तरुणांच्या हाताला काम मिळेपर्यंत त्यांना महिन्याला चार हजार रुपये दिले जातील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा पंचवीस लाखाचा आरोग्य विमा कवच काढला जाईल. शेतकर्‍यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ केले जाईल.
 
अशी कामे केली जातील. भावना घाणेकर यांनी उरण शहरात बर्‍याच समस्या आहेत त्या कडे लोक प्रतिनिधी लक्ष देत नाहीत अशी भावना व्यक्त केली. महेंद्र घरत यांनी आपला उमेदवार मनोहर भोईर यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असेही भाषणात सांगितले. यावेळी मिलिंद पाडगावकर, विनोद म्हात्रे, जे.डी. जोशी, गणेश शिंदे, अफशा मुकरी, श्रुती म्हात्रे,बी एन डाकी, प्रकाश पाटील, मनोज भगत, डॉ. मनीष पाटील, महेश वर्तक, राजेंद्र भगत तसेच महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.