प्रचाराच्या तोफा थंडावल्या , रात्र वैर्‍याची, जागते रहो...कार्यकर्ते अलर्ट

19 Nov 2024 19:09:39
 alibag
 
अलिबाग | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहेत. गेले महिनाभर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. उमेदवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत होते. सोमवारी (१८ नोव्हेंबर) संध्याकाळी सहा वाजल्यापासून हा राजकीय कल्लोळ शांत झाला. मात्र यानंतरची रात्र वैर्‍याची असल्याचे समजले जाते.
 
त्यामुळे उमेदवारांकडून ‘जागते रहो’च्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या गेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात ७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
 
मतदारांनी निर्भय होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले. अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवारी निवडणूक मतदानपूर्व तयारीबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व पत्रकारांशी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे आदी उपस्थित होते.
 
जिल्हाधिकारी जावळे यांनी निवडणूक पूर्वतयारीबाबत माहिती देताना, मतदार माहिती चिठ्ठीचे ९८ टक्के वितरण झाले आहे असे सांगून मतदानासाठी ‘छायाचित्रासह मतदार ओळखपत्रासह’पर्यायी १२ पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल. जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यादृष्टीने मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र स्थापित केले आहेत.
 
निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावर किंवा अ‍ॅपद्वारेही ही माहिती मिळू शकेल. मतदारांना वितरीत करण्यात येणार्‍या मतदार माहिती चिठ्ठीद्वारेदेखील कुठे मतदान करावयाचे आहे, ते कळू शकेल. बुधवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालू राहणार आहे. तसेच शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे.
 
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये २४ लाख ८८ हजार ७८८ इतके मतदार असून २ हजार ८२० मतदार केंद्र आहेत. जिल्ह्यातील मतदार संघामध्ये १३ हजार १९१ दिव्यांग मतदार असून दिव्यांग मतदरांसाठी व्हीलचेअर व वाहनाची प्रत्येक मतदान केद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आजपर्यंत भारत निवडणूक आयोगाच्या तक्रार निवारणावर जिल्ह्यात एकूण ५० तक्रारी दाखल झाल्या त्यापैकी ४५ केसेस मध्ये वस्तुस्थिती आढळून आली आहे. ५० केसेसपैकी ४५ केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत.
 
तर ५ केसेस चुकीच्या पध्दतीने केलेल्या केसेस रद्द करण्यात आल्या. तसेच टोल फ्री क्रमांक १९५० वर ६९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरीता वाहन व्यवस्था करण्यात येत आहे.
 
त्यामध्ये एसटी बस ३४६, मिनीबस १२४, जीप २९१ अशा एकूण ७६१ वाहने ठेवण्यात आली आहेत. वाहनांकरीता सुविधा : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसारईव्हीएम वाहतूक करणार्‍या सर्व वाहनांवर सुविधा उपलब्ध केली आहे. जिल्ह्यात १६ नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण २ हजार ६८० मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून १८ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातील अंमलबजावणी यंत्रणाद्वारे २७ कोटी ४३ लाखांचामुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
 
राज्यात १३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल आयोजित करणे, त्यांचे कोणत्याही माध्यमातूनप्रसारण करणे, एक्झिट पोलचे निकाल जाहीर करणे यावर प्रतिबंध राहील असे स्पष्ट केले आहे
 
Powered By Sangraha 9.0