कर्जत | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांचे कान टोचले आहेत. ‘जयंतराव, तुम्ही महाराष्ट्रद्रोहींसोबत आपल्या जिल्ह्याला ढकलत आहात. अजूनही दोन दिवस आहेत. तुम्ही योग्य निर्णय घ्या, असा आग्रह आमचा आहे’, असा इशारा त्यांनी दिला आहे. कर्जत मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत आणि पनवेलच्या उमेदवार लीना गरड या उमेदवारांची एकत्रित प्रचार सभा कर्जतमध्ये सोमवारी (१८ नोव्हेंबर) पार पडली.
यावेळी ते बोलत होते. भर उन्हात प्रचाराची सभा आयोजित केली होती. त्यामुळे उपस्थित उन्हात बसले होते. ही स्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी खाली येऊन उन्हात उभे राहून भाषण केले. जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र द्रोही कोण? हे ओळखून जयंतराव तुम्ही निर्णय घ्या, असा सल्ला यावेळी उध्दव ठाकरे यांनी दिला. तसेच काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील चार मतदारसंघात आपलेच असल्याचे समजून.नियोजन केले आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे त्यांनी कौतुक केले. शेतकरी कामगार पक्षाने थोडा विचार करायला हवा, विचित्र विचार करु नका, तुमच्या कुटुंबासाठी आम्ही अलिबागमध्ये माघार घेतली. महाविकास आघाडी रायगड जिल्ह्यात तुम्हाला तीन जागा देणार होती. मात्र सांगोल्यात तेथील गद्दाराला पाडण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करायला हवी होती, तसे न करता तुम्ही रायगडमध्ये चार उमेदवार दिले आहेत.
अजूनही दोन दिवस आहेत, तुम्ही योग्य निर्णय घ्या, असा आग्रह आमचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पनवेलसाठी ठोस करायचे आहे.. सिडको नवी मुंबईत अदानीला सवलत देता, पण पनवेल महापालिकेतील अडीच लाख स्थानिकांना सवलत देत नाही. त्यासाठी आमच्या उमेदवार लीना गरड यांचा लढा सुरु आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर पनवेल महापालिका क्षेत्रातील कर आणि लावलेली शास्ती उठवणार, असे जाहीर आश्वासन उद्धव ठाकरे यांनी पनवेलकरांना दिले.