पनवेल | तळोजा वसाहतीमध्ये नवी मुंबई पोलीसांनी दोन परदेशी नागरिकांकडून साडेपाच कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. पोलीसांनी याप्रकरणी परदेशी नागरीक वास्तव्य करत असलेल्या घर मालकांवरसुद्धा कारवाई केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी अंमली पदार्थ विक्रीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस वेगवेगळे सापळे रचत आहेत. अंमलीपदार्थाचा व्यापार आणि सेवन करणार्या व्यक्तींवर पोलीसांकडून सातत्याने कारवाई होत आहे.
शनिवारी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना तळोजा येथे अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. तळोजातील धरणा कॅम्प या परिसरातील शिर्के बिल्डींग येथे पोलिसांनी सापपळा रचल्यानंतर तेथे नायजेरीया देशातील व्यक्ती राहत असलेल्या घरामध्ये मेफेड्रॉन व कोकेन हे अंमल पदार्थ आढळले.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त भाउसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीकांत नायडू, निलेश धुमाळ व इतर पोलीस कर्मचार्यांनी २५ वर्षीय ओनयेका हिलरी इलोडिन्सो याच्याकडून ५ कोटी ६२ लाख ७० हजार रुपयांचे २ किलो ४२ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन आणि १७४ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ ताब्यात घेतले. तसेच ४० वर्षीय चिडीबेरे ख्रिस्तोफर मुओघालु हा पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपलेली असतानाही राहत असताना पोलिसांना सापडला. पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.