मतदानाचा हक्क गाजवण्यासाठी नवमतदार सज्ज , पनवेल विधानसभा मतदारसंघात १५ हजार ५५१ नवमतदार

By Raigad Times    20-Nov-2024
Total Views |
 panvel
 
पनवेल | राज्यातील दोन नंबरच्या मतदार संख्या असणार्‍या पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये १५ हजार ५५१ इतके मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ते आजच्या दिवसाची वाट पाहत असून त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. राज्यघटनेने १८ वर्षांनंतर दिलेला हक्क गाजवण्यासाठी ही सर्व मंडळी सज्ज झाली आहेत.
 
आपला यादी क्रमांक त्याचबरोबर मतदानाचे केंद्र ही सर्व माहिती त्यांनी जमा केली असून सकाळी लवकरच मतदानाला मित्रांबरोबर जाण्याचा संकल्प सुद्धा त्यांनी केला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघ आज शहरी पट्टा आहे. या ठिकाणी मतदारांची संख्या ही साडेसहा लाखांवर पोचली आहे. ग्रामीण भाग जरी या ठिकाणी जोडला गेला असला तरी पनवेल महानगरपालिका क्षेत्र हे कॉस्मोपॉलिटन आहे. या मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये मतदारांची संख्या वाढलेली आहे.
 
पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये नव मतदारांची संख्या सुद्धा पन्नास हजाराहून अधिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. संबंधितांनी आपला हा हक्क बजावण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन शासकीय यंत्रणा कडून करण्यात येत आहे. पनवेल परिसरामध्ये महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.
 
त्याचबरोबर नवी मुंबई पोलिसांनी सुद्धा निर्भयपणे मतदान करण्यासाठी लोकांनी बाहेर उतरावेत यासाठी प्रबोधन केले. लोकांनी लोकांसाठी चालवली यंत्रणा म्हणजे लोकशाही होय. त्यांनी आपला लोकप्रतिनिधी संसद आणि विधिमंडळात पाठवण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्याचे मोठे आव्हान शासकीय यंत्रणासमोर असेल तर नव मतदार मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत.
 
गेल्या काही दिवसांपासून ते मतदानाच्या तारखेची वाट पाहत आहेत. मोठ्या प्रमाणात तरुणाई पनवेल मतदार संघामध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहे. समाज माध्यम व त्याचबरोबर एखादी राजकीय आणि सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे अवलोकन करून आम्ही मतदान करणार असल्याची प्रतिक्रिया पहिल्यांदाच मतदानासाठी उत्सुक असणार्‍या यश विकास आंधळे याने दिली. आई-वडील मी जन्मल्यापासून मतदान करीत आहेत.
 
मी लहान होतो तेव्हा आपल्या पालकांप्रमाणेच मला मतदान करता यावं याचा खूप विचार करत असत. पण आज मलासुद्धा मतदानाचा अधिकार आला आहे. कोणत्या राजकीय पक्षाला किंवा चिन्हावर मतदान केलं यापेक्षा मतदान केंद्रावर जाऊन माझा हक्क बजावण्याचा अधिकार मला मिळणार आहे. याचा सर्वाधिक आनंद आहे. सकाळी लवकरच जाऊन मी मतदान करणार असल्याची प्रतिक्रिया सुरज हिरामण बेलोटे याने दिली.
 
नागरिक शास्त्रामध्ये आम्ही मतदान आणि सर्व प्रक्रिया याचा अभ्यास करून शाळेत प्रश्नपत्रिकेत उत्तर सुद्धा दिले. पण ही गोष्ट फक्त परीक्षा पुरती मर्यादित होती. आता मला प्रत्यक्षात मतदान करता येणार याचा खूप मनोमन आनंद आहे, असे सत्यम संजय जाधव याने ‘रायगड टाइम्स’ला सांगितले. जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा भारत हा देश आहे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये मला प्रत्यक्षात सामील होता येते हा आनंद खरोखर गगनात मावेनासा झालेला आहे असे मत पहिल्यांदा मतदान करण्यासाठी उत्सुक असणार्‍या खुशी मयूर मोरे हिने व्यक्त केले.
नेव्हीमधील श्रवण जगदाळेने बजावला पोस्टल मतदानातून हक्क!
करंजाडे येथील रहिवासी असणारा श्रवण वैशाली जगन्नाथ जगदाळे हा भारतीय नेव्हीमध्ये भरती झाला आहे. त्यांनी अठरा वर्षे पूर्ण केले असून त्याला मतदानाचा अधिकार आला आहे. कर्तव्यावर असणार्‍या श्रवण याने कोची येथील आपल्या कॅम्पस मधून पोस्टल मतदान करून मतदानाचा हक्क गाजवला. देशाचे संरक्षण करत असताना लोकशाहीचेही कर्तव्य त्याने बजावले.
भारत हा खंडप्राय देश आहे. विविध जाती धर्मातील लोक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. भिन्न भाषा, भिन्न प्रांतातील लोक गुण्या गोविंदाने नांदतात याचे प्रमुख कारण म्हणजे लोकशाही होय. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य या ठिकाणी अस्तित्वात आहे.१८ वर्षे पूर्ण केल्या प्रत्येक नागरिकांना मतदानाचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. नवमतदारांना याबद्दल प्रचंड मोठी उत्सुकता असते. या पोर्शभूमीवर तरुणाईचे मतदान सर्वाधिक होईल. त्यांच्या बरोबरीत सर्वांनीच लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यानिमित्ताने करीत आहोत. - सायली तुकाराम सरक, हिरकणी सामाजिक संस्था-कळंबोली