अलिबाग | रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान होत आहे. सात मतदारसंघात एकूण ७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून २४ लाख ८८ हजार ७८८ इतके मतदार आपला मतदान या उमेदवारांसाठी मतदानांचा हक्क बजावणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी मतदान करता येणार असल्याची महिती निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे यांनी दिली. जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघात १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर आणि शेकापचे बाळाराम पाटील यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. येथे ६ लाख ५२ हजार ६२ मतदार आहेत. उरण मतदारांघात १४ उमेदवार लढत आहेत. पैकी भाजप आमदार महेश बालदी, शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर आणि शेकापचे प्रितम म्हात्रे या तिरंगी लढतीकडेही सर्वांचे लक्ष आहे. येथे ३ लाख ४२ हजार १०१ मतदार आहेत.
कर्जत मतदारसंघात ९ उमेदवार निवडणूक लढत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे, ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे ही तिरंगी लढत चांगलीच गाजली आहे.या मतदारसंघात ३ लाख १८ हजार ७४२ हजार मतदार आहेत. तर पेण मतदारसंघात ७ उमेदवारांसाठी ३ लाख ७९ हजार ७९ मतदार आहेत. भाजपचे रविंद्र पाटील, शेकापचे अतुल म्हात्रे आणि शिवसेनेचे प्रसाद भोईर यांच्यामध्येप्रचारात चढाओढ पहायला मिळाली.
अलिबाग मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र दळवी, शेकापच्या चित्रलेखा पाटील आणि अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांच्यासह १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात ३ लाख ६२ हजार ३० मतदार आहेत. श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे, शरद पवार गटाचे अनिल नवगणे, अपक्ष राजा ठाकूर, कृष्णा कोबनाक यांच्यासह ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महाड मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून आ. भरत गोगावले, ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप यांच्यासह ५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात २ लाख ९६ हजार ३८८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकंदरीत रायगड जिल्ह्यात सात मतदारसंघामध्ये २४ लाख ८८ हजार ७८८ मतदारांची नोंद आहे. यामध्ये १२ लाख ५९ हजार ५६७ पुरुष तर १२ लाख २९ हजार १३० इतके महिला मतदार आहेत. ९१ मतदार अन्य आहेत.
मतदानाची सर्व तयारी पूर्ण...
निवडणूक मतदानासाठी यंत्रणा सज्ज असून प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठक व्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता मंडप उभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींचीपूर्तताही करण्यात आली आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार होईल, मतदारांनी निर्भय होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
मतदान केंद्रावर मोबाईल बंदी
लोकसभेच्या निवडणुकप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नाही किंवा मोबाईल नेला तरी तो बाहेर ठेवण्याची जबाबदारी मतदारांचीच असणार आहे.
मतदानासाठी १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरणार
वधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांकडे मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, शासन, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा रोजगार ओळखपत्र, कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, निवृत्ती वेतन दस्तावेज, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र आणि आधार कार्ड यांपैकी कोणताही एक पुरावा असणे आवश्यक आहे