अलिबाग | रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६१.१ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या शेवटपर्यंत हा आकडा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. सर्वाधिक मतदान अलिबाग मतदारसंघात तर कमी मतदान पनवेल मतदारसंघात झाले आहे. जिल्ह्यातील ७३ उमेदवार आणि सात भावी आमदारांचे भवितव्य बुधवारी (२१ नोव्हेंबर) मतपेटीत बंद झाले आहे. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाडचा अपवाद वगळता शांततेत पार पडले आहे. जिल्हयातील सात मतदारसंघात एकूण ७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये पनवेल १३, कर्जत ९, उरण १४, पेण ७, अलिबाग १४, पेण ७, महाडमध्ये ५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
या ७३ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतयंत्रात बंद झाले आहे. रायगडात सकाळपासून मतदारांमध्ये मतदान करण्याचा उत्साह दिसून येत होता. यावेळी मतदानाचा टक्का वाढला असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६१.१ टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक ६७. ६ टक्के मतदान अलिबाग मतदारसंघात झाले होते.
त्याखालोखाल उरण मतदारसंघात ६६.८४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक कमी पनवेलमध्ये ५२.०९ टक्के तर श्रीवर्धनमध्ये ५७.७२ टक्के मतदान झाले आहे. कर्जत मतदारसंघात ६५.८ टक्के, पेणमध्ये ६१.८, महाड मतदारसंघात ६४.४ इतके मतदान झाले होते. मतदानाच्या शेवटी सहा वाजेपर्यंत ७० टक्क्यांपर्यंत मतदान होईल, असा अंदाज आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागात केंद्रावर रांगा दिसून आल्या.
मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते आणि नेतेमंडळींकडून विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत होते. रायगडमध्ये ५५ हजार ८९३ नवमतदारांनी मतदानासाठी नोंदणी केली. मतदानानंतर बोटाला शाई लावलेले सेल्फी अनेकांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केले. त्यामुळे त्यांची मते उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मतदारांचा उत्साह वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी, काही मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.
मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग
मतदान करणे ही देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे, याचे भान राखत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, दिव्यांग व्यक्ती, नवमतदार यांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारआवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पिण्याचे पाणी, मंडप किंवा शेड, मतदार सहाय्यता केंद्र, प्रथमोपचारपेट्या, तसेच आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर आदी सुविधांमुळे ज्येष्ठांसह दिव्यांगांनी समाधान व्यक्त केले.
मतदानाची टक्केवारी
अलिबाग - ६७. ६ टक्के
उरण - ६६.८४ टक्के
पनवेल - ५२.०९ टक्के
कर्जंत - ६५. ८ टक्के
पेणमध्ये - ६१.८ टक्के
महाड - ६४.४ टक्के
श्रीवर्धन - ५७.७२ टक्के