बोर्लीपंचतनमधील वाहतूक कोंडी फुटणार , पोलिसांच्या समन्वयाने व्यापार्‍यांची बैठक

27 Nov 2024 13:32:42
 dighi
 
दिघी | श्रीवर्धन तालुयातील बोर्लीपंचतन शहराच्या मुख्य रस्त्यावर गेली अनके वर्षे वाहतूक कोंडी होत होती. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांच्या समन्वयाने ही कोंडी फुटणार आहे.
 
या वाहतूक कोंडीबाबत प्रभारी अधिकारी शिंदे यांनी बोर्ली शहरातील सर्वच व्यापार्‍यांची बैठक सोमवारी आयोजित केली होती. यावेळी मालवाहतुकीचे ट्रक कोणत्याही वेळेत पार्किंग करण्यावरुन नाराजी व्यक्त केली. दिवेआगर तसेच दिघी व श्रीवर्धनकडे जाण्यासाठी बोर्लीपंचतन हाच मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. याशिवाय स्थानिकांना या गाड्यांचा त्रास होतो.
 
सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ खरेदीसाठी बोर्लीलाच येतात. शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी याच मार्गाने जातात. वाहनधारकांच्या रांगा प्रचंड लांब असल्यामुळे अर्धा अर्धा तास वाहतुकीची कोंडी होते. राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून श्रीवर्धन तालुयातील दिवेआगरची ओळख आता वाढू लागली आहे.
 
परिणामी बोर्लीपंचतन शहरातील बाजार पेठेतील बेकायदा पार्किंगमुळे एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या, पर्यटकांची ये- जा, सोबत दळणवळणासाठी परिसरातील ३८ गावांचा सबंध असल्याने वाहतूक नियंत्रण न होण्यास कारण बनले होते. यावेळी पोलिसांकडून कोंडीवर कायमस्वरूपी नियोजन होत असल्याने लवकरच प्रवासी, पादचार्‍यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
पोलिसांनी सुचवले हे उपाय -
यापार्‍यांनी दुपारी यावेळेत माल उतरावा, एकाच वेळेला किराणा मालाचे ट्रक रस्त्यात पार्कींग करू नये, दिवेआगर पर्यटनसाठी विकेंडला होणारी गर्दी पाहता, या दिवसात माल ट्रक बोलावू नये. आता पोलिसांच्या या नियोजनामुळे लवकरच चालकांना दिलासा मिळणार आहे.
माल उतरताना ठरलेल्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक व्यापार्‍यांकडून पोलीस प्रशासनाला व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य राहील. - मनुभाई कोठारी, व्यापारी संघटना अध्यक्ष
Powered By Sangraha 9.0