पेण | पेण, अलिबाग, पनवेल विधानसभा मतदार संघ हे शेकापच्या उमेदवारांसाठी सोडले असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी सोमवारी जाहीर केले होते. त्यामुळे पेणमधून महाविकास आघाडीचा मीच अधिकृत उमेदवार आहे, असा दावा पेण येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी केला.
कालपर्यंत भाजपचे विधानसभाप्रमुख म्हणून पद मिरवणार्या उमेदवाराने नंतर अपक्ष असल्याची घोषणा केली व अचानक महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते उमेदवार महाविकास आघाडीचे नसून ही भाजपची बी टीम आहे असा आरोप यावेळी अतुल म्हात्रे यांनी केला.
थोडक्यात ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे, असेही म्हात्रे म्हणाले. गेल्या १० वर्षांपासून १९१ पेण सुधागड रोहा मतदार संघाचे विद्यमान नेतृत्व हे निष्क्रिय असल्याने जनतेमध्ये त्यांच्याविरोधात नाराजी आहे. पेण मतदारसंघाचा विकास करण्यात ते अपयशी ठरले आहेत. आजही या मतदार संघात रोजगार, बँक घोटाळा, पाणी, रस्ते असे अनेक प्रश्न आहेत.
गडब विभागात होऊ घातलेली एमआयडीसी व त्यामुळे शेतकर्यांवर आलेले संकट तसेच एमएमआरडीए अंतर्गत येणारे विविध प्रकल्प व त्यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. या सर्वांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता एक सक्षम व दूरदृष्टी असणारा आमदार पेणला आवश्यक आहे.
व त्यामुळे मला या आमदारकीच्या निवडणूकीत येथीलजनता निश्चित निवडून देईल असा विश्वास पेण येथील पत्रकार परिषदेत उमेदवार अतुल म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते महादेव दिवेकर, अॅड.रोशन पाटील, तुकाराम खांडेकर, नंदकुमार म्हात्रे, वडखळचे माजी उपसरपंच निलेश म्हात्रे, प्रल्हाद पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे अनेक जेष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.