उरण विधानसभेत हवा; प्रितमदादा आमदार नवा , उरण विधानसभेचा नव्या आमदाराचा इतिहास पुन्हा घडणार

By Raigad Times    08-Nov-2024
Total Views |
 uran
 
उरण | स्वातंत्र्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता आणि यापुढेही तो राखण्यासाठी नव्या उमेदीने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. येत्या निवडणुकीत शेकापचे कार्यकुशल व धडाडीचे युवानेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांना निवडून देतील, असा विश्वास शेकाप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.
 
उरण विधानसभा निवडणुकीत तरुणांना प्रितमदादांच्या रूपाने नवा आमदार हवा आहे, असेही कार्यकर्ते मतदारसंघात मिळणार्‍या प्रतिसादावरुन बोलत आहेत. उरण विधानसभेचे नेतृत्व शेकापचे जेष्ठ नेते माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील, माजी विरोधी पक्षनेते दत्ता पाटील, माजी आमदार दत्तूशेठ पाटील, माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील, माजी आमदार विवेक पाटील यांनी केले आहे. शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेसाठी लढणार्‍या वीरांचा मतदारसंघ आहे.
 
ज्या १९८१ च्या सिडको विरोधी आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या साथीने जासई नायावर आपलं रक्त सांडणारे व १९८४ च्या ऐतिहासिक उरण शेतकरी आंदोलनाचे नेते सुप्रसिद्ध उद्योजक व शेकापचे जेष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांचा संघर्षाचा वारसा आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष हा नव्या उमेदीने उतरला आहे. त्यासाठी मतदारसंघात गावोगावी बैठका सुरू आहेत.
 
आतापर्यंत अनेक कारणांमुळे शेतकरी कामगार पक्ष सोडून इतर पक्ष व संघटनेत गेलेले शेकाप कार्यकर्ते पुन्हा एकदा आपल्या मूळ विचारांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये ही उत्साह निर्माण झाला आहे. या निवडणुकीत समाजातील सर्व स्तरातील मतदार शेतकरी कामगार पक्षाच्या मागे उभे राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसरात्र काम करून शेतकरी कामगार पक्षाचे जुने दिवस परतून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
 
यावेळी उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष हा आरपारची लढाई लढण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे नवी ऊर्जा घेऊन कार्यकर्त्यानी वज्रमूठ घट्ट करून गावोगावी कामाला लागण्याचेही आवाहन त्यांनी केले. आता एकच लक्ष नव्या युगाचा शेकापक्ष असाही नारा या निमित्ताने दिला आहे.