म्हसळा | श्रीवर्धन मतदारसंघातील पाचही तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्यांनी अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकूर हे अपक्ष उमेदवार असले तरी त्यांच्या माध्यामातून श्रीवर्धनमध्ये काँग्रेस टिकणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती तळा तालुका अध्यक्ष शरद भोसले यांनी सांगितली.
श्रीवर्धन मतदारसंघातील पाच तालुक्यातील काँग्रेसच्या तालुका अध्यक्षानी गुरुवारी (७ नोव्हेंबर) संयुक्त पत्रकार परिषद आयोजीत केली होती. रायगड आणी रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही. श्रीवर्धन मतदारसंघ बॅरिस्टर स्व. ए. आर. अंतुले यांची जन्मभूमी आणि कर्मभुमी आहे.
याउलट श्रीवर्धन मतदारसंघात शरद पवार गटाचे अस्तित्व वादांतीत आहे. असे असताना त्यांना हा मतदारसंघ सोडला जातो याची खंत असल्याचे या तालुकाध्यक्षांनी सांगितले. श्रीवर्धनमध्ये या निवडणुकीत राजाभाऊंमुळे काँग्रेसचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांचा नाही तर अपक्ष उमेदवार रायगड जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते राजेंद्र ठाकूर यांचा प्रचार करणार असल्याची भूमिका या पदाधिकार्यांनी जाहीर केली.
यावेळी म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ. मूईज शेख, माणगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सादिक राऊत, रोहा तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, तळा तालुका अध्यक्ष शरद भोसले, रायगड काँग्रेस कमिटी सरचिटणीस सुफीयान हळदे,रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, डॉ. सिंह, शहरअध्यक्ष अश्फाक काठेवाडी, महिला अध्यक्षा नाझिमा मुकादम, युवतीअध्यक्षा आरती पेडणेकर, युवक अध्यक्ष मजीद सुभेदार, एजाझ घरटकर, नईन कादिरी, शब्बीर फकीर, फारूख परकार, अबरार काळोखे, आदम भाई उपस्थित होते.