उरण,श्रीवर्धनमध्ये महाआघाडीचे काम करा , जिल्हा काँगे्रस अध्यक्ष महेंद्र घरत यांचे कार्यकर्त्यांना निर्देश

श्रीवर्धन मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे लक्ष

By Raigad Times    09-Nov-2024
Total Views |
tala
 
तळा | उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांचे काम करण्याच्या सूचना काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांच्या जीवात जीव आला आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीवर्धन मतदारसंघातील काँगे्रसच्या पाचही तालुकाध्यक्षांनी अपक्ष उमेदवार राजा ठाकूर यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे येथे आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आलेहोते.
 
महाविकास आघाडीच्या जागावाटपात रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेसला एकही उमेदवार न दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मागील आठवड्यात अडिचशे पदाधिकार्‍यांसमवेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. दरम्यानच्या काळात घरत हे महाआघाडीचे काम करण्यास तयार झाल्याचे दिसून आले आहे.
 
शुक्रवारी उरणचे महाआघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांचे काम करण्याच्या सूचना त्यांनी काँगे्रस कार्यकर्त्यांना दिल्या. त्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघातील महाआघाडीचे काम करण्यास लेखी कळवले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे हात बळकट करावेत.
 
यासाठी श्रीवर्धन मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व राज्यात आघाडीची सत्ता येण्यासाठी कामाला लागावे, असे या पत्रात म्हटले आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये काँगे्रसच्या पदाधिकार्‍यांनी अनिल नवगणे यांचे काम करण्यास नकार देतानाच, उपक्ष उमेदवार राजा ठाकूर यांना पाठिंबा दर्शवला होता.
 
मात्र काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांना जिल्हा काँग्रेसने पाठींबा दिला आहे. त्यामुळे एक दिवस आधी विरोधात भूमिका घेणारे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांना काँग्रेसने जाहीर पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे अनिल नवगणे यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. नवगणे यांची लढत मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत होणार आहे.