भरधाव आलिशान कार थेट गॅरेजमध्ये घुसली , तीनजण गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना

11 Dec 2024 12:46:25
 alibag
 
अलिबाग | अलिबाग ते रेवस मार्गावर चोंढीजवळ भरधाव कार थेट गॅरेजमध्ये घुसून अपघात झाला. यात गॅरेजमालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. त्याच्यावर अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
 
रवी पाटील (वय ५०, रा. धोकवडे, गॅरेजमालक), मंगेश यशवंत म्हात्रे (वय ५२, रा. आगरसुरे), सोनू मधु नाईक (वय ४५, रा. किहीम) अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी (९ डिसेंबर) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भरधाव बीएमडब्ल्यू कार अलिबागकडून रेवसच्या दिशेने निघाली होती.
 
चोंढी गावापासून जवळच डे फार्महाऊसशेजारी रस्त्याच्या कडेला असलेल्या गॅरेजच्या शेडला धडक देत कार थेट आत घुसली. यात गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी आलेल्या दुचाकी वाहनांचेही नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मांडवा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
 
जखमी झालेल्या तिघांना इतर वाहनचालकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आणि वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कारचालक संदीप विलास गायकवाड यांची मद्यसेवनबाबत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खोत करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0