अ‍ॅड.आस्वाद पाटील यांचा शेकापला अखेरचा लाल सलाम , चिटणीसपदासह शेकाप सदस्यत्वाचा दिला राजीनामा

11 Dec 2024 12:24:05
alibag
 
अलिबाग | शेकापचे चिटणीस शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम केला आहे. त्यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आस्वाद पाटील यांच्या या निर्णयामुळे शेकापला मोठा हादरा बसला आहे. त्यांच्यासोबत शेकापची मोठी फळी शेकापमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु आहे.अ‍ॅड. आस्वाद पाटील हे माजी मंत्री स्व.मीनाक्षी पाटील यांचे पूत्र आहेत.
 
तर शेकाप नेते जयंत पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांचे भाचे आहेत. शेकापक्षात त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद तसेच बांधकाम सभापतीपद भूषवले आहे. जिल्हा परिषदेचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना पक्षासोबत बांधून ठेवले होते. त्यांच्यासोबत शेकापची मोठी फळी कार्यरतआहे.
 
मात्र गेल्या काही महिन्यांपासून अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्यासोबतच पेझारीकरपाटील कुटुंबीय नाराज होते. जयंत पाटीलयांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील यांचा वाढताु हस्तक्षेप आणि जयंत पाटील यांचे मनमानी निर्णय ही नाराजीची दोन प्रमुख कारणे असल्याचे म्हटले जाते. शेकापच्या महिला आघाडीप्रमुख पदावर कार्यरत असलेल्या चित्रलेखा पाटील या शेकापच्या जुन्या कार्यकर्त्यांना विचारात घेत नव्हत्या.
 
पक्षावर त्यांनी कब्जा करायला घेतला होता, असेही म्हटले जात आहे. त्यातच विधानसभा निवडणूक लढविण्याची चित्रलेखा पाटील यांनी परस्पर सुरु केलेली तयारी पेझारीकरांना फारशी रुचलेली नव्हती. त्यामुळे मनात खदखद सुरु होती. पंढरपूर येथे झालेल्या शेकापच्या अधिवेशनामध्ये पंडित पाटील यांनी भर व्यासपीठावरुन पक्षाच्या नेत्यांना सुनावल्याचे सर्वांनी पाहिले. शेकापक्ष आपल्याही बापाचा असून कोणाचीही मनमानी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता.
 
अतुल म्हात्रे यांची पक्षाच्या कार्यकारिणीत झालेली निवड हे याला कारण ठरले असले तरी वेश्वी आणि पेझारीकरांमध्ये आग आधीपासूनच धुमसत होती. पाटील कुटुंबातील नातेसंबंध पाहता शेकापमधील हा वाद संपेल, विधानसभा निवडणुकीत तरी पेझारी आणि वेश्वीकर एकत्र येतील, असे शेकाप कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र पंडित पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी सुचविलेल्या अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनादेखील ती दिली नाही.
 
याउलट पेझारीकरांचा विरोध डावलून जयंत पाटील यांनी चित्रलेखा यांना उमेदवारी दिली आणि शेकापचे गणित बिघडत गेले. शेकापचे चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी पंडित पाटील यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यांनी मंगळवारी (१० डिसेंबर) आपल्या प्रमुख सहकार्‍यांची बैठक घेऊनचर्चा केली. यानंतर त्यांनी पक्षाच्या चिटणीस आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी पक्षाच्या चिटणीस आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
 
माजी आमदार पूत्र सवाई पाटील, सुमना पाटील यांच्यासह शेकापची एक मोठी फळी अ‍ॅड. पाटील यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी शेकापचा राजीनामा दिल्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. राजीनाम्यानंतर ते भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात ते काय निर्णय घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0