अलिबाग | बांग्लादेशात हिंदूंवर होणार्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी (११ डिसेंबर) अलिबाग येथे सकल हिंदु समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या मोर्चात विविध हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देत हे अत्याचार थांबविण्याबाबत केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, बांग्लादेश सरकारला तसे निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.
अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरूवात झाली. आंदोलकांनी हातात फलक धरत आपल्या भावना व्यक्त करून बांग्लादेशातील हिंदुवरील अत्याचार थांबवावेत, अशी मागणी केली. बांग्लादेशात कट्टरपंथीय मुस्लिमांकडून हिंदुंची मंदिेरे, घरेदारे दुकाने जाळली जात आहेत.
तेथील हिंदु महिलांवरदेखील अमानवीय अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध आदिवासी, दलित हिंदु बांधवांना अत्याचारापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बांग्लादेशमधील सरकारदेखील हिंदु व अन्य अल्पसंख्यांक यांच्यावरील अत्याचारास मुकसंमती देत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला. स्वातंत्र्याच्या वेळी बांग्लादेशमध्ये हिंदुंची संख्या ३३ टक्के होती ती आता ८ टक्के इतकीच राहिली आहे.
आपल्या सरकारने वेळीच पावले उचलली नाही तर तेथील हिंदु इस्लामी कटटरवादाला बळी पडून नामशेष होण्याची भीती या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. तेथील हिंदुंच्या रक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय अंमलात आणावेत व या जाचातून हिंदुंची मुक्तता करावी अशी विनंती सरकारला करण्यात आली आहे.
आ. महेंद्र दळवी यांनीमोर्चाच्या सुरूवातीला उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते, माजी तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, शेकापचे प्रशांत नाईक, विश्व हिंदु परीषदेचे चेतन पटेल, ऋषीकेश भातखंडे, रविकिरण काळे आदिंसह विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.