महाडमध्ये चोरट्यांचे पोलिसांना आव्हान , भर बाजारपेठेत दुकान फोडण्याचा प्रयत्न

11 Dec 2024 19:47:48
 mhad
 
महाड | मागील वर्षभरापासून महाड शहराच्या विविध भागांमध्येझालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी, ९ डिसेंबरला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भर बाजारपेठेमध्ये एक दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले.
 
दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महाड शहरात भरबाजारपेठेमध्ये हुतात्मा, अर्जुन भोई कानू कडू चौकात असलेल्या एका दुकानात रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कटावणी लावून दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्हीमध्ये पहावयास मिळत आहे.
 
रात्री फेरीसाठी पोलिसांची गाडी त्या परिसरातून गेल्याचेही या फुटेजमध्ये पहावयास मिळत असून या चोरट्यांनी केलेले प्रयत्न असफल ठरल्याचे सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालक व नोकरांना निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखूनमहाड पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी आपल्या सहकार्‍यांसह तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व सीसीटीव्हीच्या माध्यमातून यासंदर्भात पुढील तपास करण्याच्या सूचना त्यांनी आपल्या सहकार्‍यांना दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच नातेखिंड परिसरात सहा बंद घरे फोडण्याचा प्रकार घडल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील दुकानच फोडण्याचा हा प्रयत्न करत, या चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.
 
Powered By Sangraha 9.0