अलिबाग । मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अनुचित घटना घडल्याने शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्याआहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील दोन हजार 528 शाळांमध्ये किमान 30 हजार रुपयांचे युनिट बसवण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे पडून आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतची शासकीय उदासीनता समोर आली आहे. मतदान केंद्रांवर निवडणूक विभागाने सीसीटीव्ही नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 1 बसवले होते; परंतु ते कायम ठेवण्यात आले नाहीत. मतदान होताच ते काढून नेण्यात आले.
रायगड जिल्ह्यात खासगी शाळा शंभर टक्के सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहेत, तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या मिळून जेमतेम 300 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ज्या तालुक्यांमध्ये सीएसआर फंड उपलब्ध आहे, अशा शाळांमध्ये प्राधान्यक्रमाने सीसीटीव्ही बसवून घेण्याच्या सूचना प्राथमिक जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत. अद्यापही सीसीटीव्ही यंत्रणा नसलेल्या शाळांची संख्या मोठी आहे.
निधीच उपलब्ध न झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुरक्षेबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातील इमारतींची डागडुजी अनेक वर्षांपासून रखडली आहे. मोडकळीस आलेल्या शाळांमध्ये आपल्या मुलांना शाळेत सोडण्यास पालक तयार नसतात. काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थिनीवर घडलेल्या अतिप्रसंगांनंतर राज्यातील सर्व सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे.
दोन हजार 528 शाळांचा प्रस्ताव
जिल्ह्यातील पडक्या शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आधीच धोक्यात आली आहे. जिल्ह्यातील दुर्गम शाळांच्या दुरुस्तीचा भार माजी विद्यार्थी उचलतात. मात्र, आता सीसीटीव्ही यंत्रणेसाठी कराव्या लागणार्या खर्चासाठी पैसे जमवताना अडचणी येत आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दोन हजार 528 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा नियोजनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे झालेल्या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात सरकारकडून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे हा त्यापैकीच एक पर्याय आहे; मात्र निधीअभावी जिल्ह्यातील आजही अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाही.
यंत्रणा बसण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजनाकडे पाठवला आहे; मात्र अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. काही तालुक्यांमध्ये असलेल्या कंपन्यांकडून किंवा माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत मिळत असेल तर प्राधान्यक्रमाने सीसीटीव्ही बसवून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. - पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग
मतदान केंद्र ही नगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असतात. एकूण मतदान केंद्राच्या 50 टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्या होत्या. त्यानुसार एक हजार 653 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवले होते. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच ते काढण्यात आले. - नितीन वाघमारे, निवडणूक अधिकारी, रायगड
शाळेतील अल्पवयीन मुली अत्याचाराची माहिती पालकांना देताना घाबरतात. मुलींनी तक्रार केली तरी ठोस पुराव्याअभावी आरोपींची सुटका होते. मोबाईलच्या अतिवापरामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे. हे रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे गरजेचे आहे. - अॅड. मानसी म्हात्रे, महिला राज्य प्रमुख-शेकाप