अलिबाग । उसने दिलेल्या पैशांच्या वादातून अलिबाग तालुक्यातील कातळपाडा येथे तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. हत्या करुन पसार झालेल्या दोघांना पोयनाड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (12 डिसेंबर) बेड्या ठोकल्या आहेत. कातळपाडा येथे बुधवारी (11 डिसेंबर) रात्री पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित प्रफुल्ल वाघ (37, रा. कातळपाडा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमितने कोपरी-कुर्डूस येथील व्यक्तींकडून उसने पैसे घेतले होते. ती रक्कम परत दिली नाही. त्याचा राग धरुन चंद्रकांत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे हे बुधवारी रात्री अमितच्या घरी गेले आणि उसने दिलेल्या पैशांची मागणी केली.
त्यावेळी वाघ आणि म्हात्रे यांच्यात शाब्दीक वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचला. दोघांनी शिवीगाळी करत हाताबुक्क्याने व लाथेने मारहाण केली. त्यानंतर त्याला घरातून बाहेर पडवीमध्ये खेचत आणले. चंद्रकांतने अमितचा गळा दाबला आणि अक्षयने अमितच्या गुप्त भागावर लाथ मारुन पुन्हा त्याला मारहाण केली.
त्यामध्ये तो गंभीर जखम झाला. या मारहाणीत अमितचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चंद्रकांत आणि अक्षय हे दोघेही पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोयनाड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांचा शोध सुरू केला. अखेर गुरुवारी सायंकाळी त्यांना पकडण्यास यश आले. याप्रकरणी चंद्रकांत म्हात्रे व अक्षय म्हात्रे यांच्याविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक केल्याची माहिती समोर येत आहे.