पोलादपूरकरांचा वाढीव मालमत्ता कराला ठाम विरोध

16 Dec 2024 18:33:31
 poladpur
 
पोलादपूर । पोलादपूर नगरपंचायतीने अकारण वाढवलेल्या मालमत्ता कराच्या नोटीसांमुळे पोलादपूरकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या मालमत्ता कर वाढीविरोधात कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात नागरिकांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये उपस्थित नागरिकांनी वाढीव घरपट्टीच्या निर्णयाला ठाम विरोध दर्शवला आणि या संदर्भात पोलादपूर नागरी तक्रार निवारण मंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
 
यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी कायदेशीर मार्गांची माहिती दिली आणि नगरपंचायतीकडे हरकत नोंदवण्यासाठी नागरिकांना हरकत अर्जाचा नमुना देण्यात आला. संतप्त नागरिकांनी, ही लढाई आता जनतेलाच लढावी लागेल, असे ठामपणे सांगितले. सभेत घरपट्टी वाढीबाबतच्या विविध तक्रारींवर चर्चा करून नागरिकांना पुढील मार्गदर्शन करण्यात आले.
 
याशिवाय हरकती दाखल करून आपल्या अधिकारांसाठी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता, या लढ्याला व्यापक पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
 
 
Powered By Sangraha 9.0