मुंबई-गोवा महामार्गावर पसरलेय धुळीचे साम्राज्य , वाहचालकांसह प्रवासी वर्ग हैराण; धुळीमुळे मिळतेय आजारांना निमंत्रण

16 Dec 2024 18:22:10
 kolad
 
कोलाड । मुंबई गोवा महामार्ग 66 वरील चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु या चौपदरीकरणासाठी वापरण्यात येणारी माती, सिमेंट, खडी रस्त्यावर पडत असल्यामुळे या महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. खांब, पुई, कोलाड बाजारपेठेत ते तळवली रातवड या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे येथे प्रचंड धूळ पसरत आहे. या धुळीमुळे वाहनचालकांसह प्रवासी, रहिवाशी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
 
मुंबई-गोवा महामार्गांवर धुळीचा त्रास होऊ म्हणून रस्त्याला पाण्याची फवारणी केली जात आहे. परंतु या फवारणीमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. या चिखलातून मार्ग काढतांना दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. यामुळे प्रवासी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. याला जबादार कोण? असा प्रश्न प्रवासीवर्गातून केला जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून सुरु आहे.
 
विधानसभा निवडणुकीनंतर हे काम युद्धपातळीवर सुरु असले तरी या कामात कोणतेही नियोजन दिसून येत नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड, खांब, पुगांव, पुई, कोलाड बाजारपेठ, वरसगांव, तळवली ते रातवड या ठिकाणी रस्ता काँक्रिटिकरण, उड्डाणपूल, छोटे मोठे ब्रिज, गटार, बायपास रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु ‘शासकीय काम बारा महिने थांब’ या म्हणीप्रमाणे सुरु आहे. यामुळे या महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होईल? याची खात्री देता येत नाही. कोलाड बाजारपेठेत तसेच तळवली, पुई, खांब येथील महामार्गवरील रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
 
या धुळीमुळे वाहचालकांसहित, प्रवासी वर्ग, व्यापारी तसेच रहिवाशी नागरिक बेजार झाले आहेत. वेगाने येजा करणार्‍या वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान होत आहे. याला पर्याय म्हणून रस्त्यावर पाणी मारले जात आहे. परंतु या पाण्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे तर दोन तासांनी परिस्थिती जैसे थे अशीच होते. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
 
मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या महामार्गावर दररोज अपघात होत असून यामुळे असंख्य नागरिकांचा नाहक बळी जात आहे. शिवाय रस्त्यावर पसरत असलेल्या धुळीमुळे समोरील रस्ता दिसेनासा होतो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. धुळीमुळे सर्दी, दमा, खोकला, घशाचे आजार डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यामुळे लोकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी महामार्गाचे काम लवकरच लवकर पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी, वाहनचालकांमधून केली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0