महाडमधील १०६ कंपन्यांना ‘वॉर्निंग’ नोटीसा ; जल, वायू प्रदूषण केल्यास कठोर कारवाई; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा

18 Dec 2024 19:42:11
 mhad
 
महाड | महाड औद्योगिक क्षेत्रातील टेमघर नाल्यावाटे काळ व सावित्री नदीत सोडणार्‍या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे या दोनही नद्या प्रदुषित झाल्या. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात सावित्री नदीपात्रात तीन वेळा झालेल्या जलप्रदूषणाने महाड शहरासह परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
 
दरम्यान, या जल आणि रात्रीच्या वेळी केल्या जाणार्‍या वायू प्रदूषणासंदर्भात महाड औद्योगिक वसाहतीमधील १०६ कंपन्यांना वॉर्निंग नोटीस बजावल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड विभागाचे अधिकारी ईश्वर हरिप्रसाद ठाकरे यांनी दिली आहे. धकारी ईश्वर हरिप्रसाद ठाकरे यांनी दिली आहे. यातील काही कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या सांडपाण्याचे सॅम्पलिंग घेण्यात आले आहे.
 
यापैकी काही कंपन्यांनी आपला खुलासा पाठवला असून जोपर्यंत आपण या ठिकाणी कर्तव्यावर आहोत, तोपर्यंत जर हवा व पाणी प्रदुषणाचा प्रकार निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ईश्वर ठाकरे यांनी दिला आहे. मागील सुमारे एक, दोन महिन्यांपासून सावित्री नदीपात्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत काही कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. यामुळे टेमघर नाल्यासह परिसरातील अनेक ठिकाणी परिसरातील पाण्याची ठिकाणे रंगीत झाल्याच्या तक्रारी स्थानिक जनतेकडून करण्यात आल्या.
 
महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कंपन्यांपैकी (लाल संसर्ग) हवा व पाणी प्रदुषणास जबाबदार असलेल्या १०६ कंपन्यांना प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस बजावून त्यांचेकडून अहवाल मागविण्यात आला होता. यामध्ये सुदर्शन केमिकल, महाराष्ट्र अल्देहाईड, डुप्लॉन इंड, पिडीलाईट, इंडो अमाईन लि., अ‍ॅस्टेक लाईफ सायन्सेस आदी कंपन्यांचा समावेश आहे. कंपन्यांना देण्यात आलेल्या नोटिसांसंदर्भात त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
सावित्री बचाव समिती व संबंधित नागरिकांकडून करण्यात आलेल्या या तक्रारीची गंभीर दखल घेऊन महाड उत्पादक संघटन चालविण्यात येणार्‍या सीटीपीमध्येही याबाबत आपण चर्चा केल्याची माहिती दिली. या ठिकाणी लॉक अँड की सिस्टीम कार्यान्वित असून या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार पूर्तता झाली असल्यास येथून डिस्चार्जची परवानगी दिली जाते असे त्यांनी सांगितले.
 
ऑनलाईन पद्धतीने सर्व संबंधित कंपन्यांचे सीओडी व बीओडी आता उपलब्ध होऊ शकतात असे त्यांनी सांगितले. महाडमधील वायु प्रदूषणासंदर्भात पूर्वी असलेली खाजगी संस्थांना द्यावयाची पद्धत व तपासणी शासनाच्या निर्देशानुसार बंद केली असून महाडमध्ये सीटीपी परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासंदर्भात यंत्रणा स्थापित केली असून त्याचा ऑनलाईन पद्धतीने येणार्‍या अहवालानुसार कारवाई केली जाते, अशी माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0