नागपूर | आ.भरत गोगावले यांचे हुकलेले मंत्रीपद आणि शिवलेला कोट हा गेली दोन अडिच वर्षे महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला होता...नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्री होण्याची संधी मिळाली. पहिल्याच दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवनिर्वाचित मंत्र्यांचा परिचय करुन देत होते. यावेळी मंत्री भरत गोगावले यांचे नाव पुकारण्यात आले अन् सभागृहात हशा पिकला. विषय अर्थातच त्यांनी शिवून ठेवलेला कोट.
भरतशेठ यांनीही मग सर्वांना हात जोडून दाद दिली.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड केले. त्यांच्या बंडाला भरत गोगावले यांनी सुरुवातीपासूनच साथ दिली. त्यामुळे त्यांना शिंदेच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा होती. स्वतः गोगावले यांनाही मंत्रिपद मिळेल असा विश्वास होता. आपली इच्छा त्यांनी अनेकदा बोलून दाखवली; पण तरीही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. अनेकदा त्यांनी मिश्किलपणे आपण चार कोट शिवून ठेवल्याचे म्हटले होते. आता महायुतीच्या फडणवीस सरकारमध्ये त्यांची वर्णी कॅबिनेट मंत्रीपदी लागली आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन मंत्र्यांचा परिचय करून देत होते. भरतशेठ यांचे पहिल्यांदा नाव उच्चारले तेव्हा ते अनुपस्थित होते. काही वेळानंतर पुन्हा काही मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी परिचय करून दिला. भरतशेठ गोगावले यांचे नाव उच्चारताच विरोधकांनी ‘अखेर आता कोट कामी आलेच’ अशी टिप्पणी केल्यानंतर सभागृहात चांगलाच हाशा पिकला.
अन् त्यांनीही सर्वांना हात जोडून दाद दिली. भरत गोगावले शिवसेनेकडून सलग चारवेळा निवडून आले आहेत. २०१९ साली उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर भरतशेठ यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तेव्हा महाआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळाले. इतकेच नाही तर शिवसेनेच्या तिन्ही आमदारांच्या विरोधानंतरही रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्यात आले.
याची खदखद गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांमध्ये होती. त्यामुळे २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात रायगडच्या तिन्ही आमदारांनी ठाकरे यांची साथ सोडली. भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांचे ‘राईट हँड’ आ.भरत गोगावले मंत्री होणार, अशी चर्चा सुरु झाली. त्यांनीही आपण कोट शिवून तयार असल्याचे म्हटले होते. पुढे एकनाथ शिंदे यांचे सरकार टिकावे, यासाठी आपण मंत्रिपदाचा त्याग केल्याचे त्यांनी सांगितले.
पुढच्या विस्तारात आपण मंत्री होऊ, असे ते सांगत राहिले. मात्र शेवटपर्यंत त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. सरकारच्या कार्यकाळात त्यांना वीस दिवसांसाठी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यांनी या वीस दिवसांतही महामंडळाचा डोलारा सांभाळला. देवेंद्र सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळले आहे. परंतू ‘कोट शिवून’ ठेवल्याची टिप्पणी भरतशेठचा अजूनही पिच्छा पुरवत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात भरतशेठ गोगावले यांचे नाव उच्चारताच विरोधकांनी आता कोट कामी आलेच, अशी मिश्कील टिप्पणी विधानसभेत केली. यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला.