पनवेल | पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर, फूटपाथवर अतिक्रमण करणार्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना मंगळवारी घेतलेल्या बैठकीमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या आहेत. फूटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूकीला व पादचार्यांना चालण्यास अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेच्यावतीने ही तोडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
या बैठकीत महापालिका कार्यक्षेत्रात भरत असलेल्या अधिकृत बाजाराव्यतिरीक्त अनधिकृत आठवडी बाजारांवर महापालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. तसेच रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा आणून सुरू असलेल्या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्या अगर स्टॉलवर तोडक कारवाई करून सिलेंडर जप्त करण्याबाबत आयुक्त महोदयांनी उपस्थितांना सूचना दिल्या.
गेल्या आठवड्यापासून महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत व्यवसायिकांविरोधात मोठी तोडक कारवाई करण्यात येत असून खारघरमध्ये जलवायू रोडवरती अनधिकृतरित्या व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने याठिकाणी तोडक कारवाई केली. तसेच खारघरमधील सेटर १९ मध्ये मार्केटमध्ये रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणार्यांवर तसेच अनधिकृत हातगाड्यांवर जेसीबीच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आली. टोल नाका हायवेवर अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून फुटपाथ व रस्ता मोकळा केला.
तसेच कळंबोलीमध्ये रस्त्यावर अनधिकृत भाजीचा, आईस्क्रीमचा, फुल विक्रीचा, खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणार्या व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई करून सर्व सामन जप्त केले. रोडपाली कमानीजवळ अनधिकृत व्यवसाय करणार्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती ब अंतर्गत खांदा कॉलनी न्यू पनवेल फुटपाथ वरील अनाधिकृत स्टॅन्ड व बॅनर काढण्यात आले.
हायवेवरील सर्व हेल्मेट विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच भीमा कॉम्प्लेस येथील अनधिकृत टपरींवर कारवाई करण्यात आली. याबरोबर तळोजा फेज १व नावडे फेज २ मध्ये यांनी फूटपाथवरती खाद्यपदार्थांच्या दुकानाबाहेर अतिक्रमण करून विकल्या जाणार्या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरती अतिक्रमण विभागाच्या साह्याने कारवाई केली.
शनिवारी मार्केट मार्गावर अनधिकृत व्यावसायिकांना बसण्यास मनाई करून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा ठेवण्यात आला. रविवार मार्केट बंद ठेवण्यात आले व मार्केटमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करु दिला नाही. याबरोबरच खांदेश्वर येथील फुटपाथवर अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करून सर्व सामान जप्त करण्यात आले.