म्हसळा । बळीराज सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, कुणबी समाज नेते कृष्णा कोबनाक यांचे रविवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी ठाणे येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच जिल्हाभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्यांनी बळीराज सेनेतर्फे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांशी प्रेरित होऊन शिवसेनेत काम केले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये काम केले.नव्याने सामाजिक स्तरावर स्थापित झालेल्या बळीराज सेनेचे उपाध्यक्ष पदावर काम करीत होते. मनमिळावू, संयमी, कुशल संघटक, अजातशत्रू, युवकांचे आशास्थान म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परीवार आहे.