धूल चेहरे पर थी और वो...ईव्हीएमवरुन मुख्यमंत्र्यांचा टोला

20 Dec 2024 12:24:54
 nagpur
 
नागपूर | "ग़ालिब ताउम्र ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और वो शीशा पोछते रहे..." मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांवर जोरदार प्रतिहल्ला केला. त्यांनी ईव्हीएम विरोध, महाराष्ट्रातील उद्योगधंदे, जल शिवार योजना, मराठी भाषा अभिजात दर्जा आणि परकीय गुंतवणूक, मेरिटाईम इकोनॉमिक्स आदी विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न खोडून काढले.राज्यपालांच्या अभिभाषणावरील विधानसभेत गुरुवारी (१९ डिसेंबर) झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.
 
फडणवीस यांनी, विधानसभेत ईव्हीएमची कार्यपद्धती सांगतानाच १९८० साली सर्व प्रथम ईव्हीएमचे तंत्र आले. त्यानंतर अनेक निवडणूका काँगे्रसने याच ईव्हीएम पध्दतीने जिंकल्या. शंका असेल तर निरसन झाले पाहिजे. ईव्हीएममध्ये काही दोष असेल तर सिध्द करण्यासाठी निवडणूक आयोगानाने आठ दिवसांना वेळ सर्व पक्षांना दिले होते. पण तेव्हा एकही पक्ष पुढे आला असे त्यांनी म्हटले आहे.
 
ईव्हीएमसंदर्भात विरोधकांनी अतिरिक्त ७६ लाखांचे मतदान कसे झाले? असे विचारले होते. यावर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "सरासरी प्रत्येक तासाला ५.८३ टक्के मतदान झाले आहे. सरासरी ताशी मतदान जवळपास ६० लाखांचे आहे. प्रतिमिनिट मतदान जवळपास ९७ हजार १०३ इतके आहे. याचा अर्थ एकूण विचार करता ६ वाजल्यानंतरच्या मतदानाचा हिशेब लावला तर ते फक्त १७ लाख इतके आहे”, असे फडणवीस म्हणाले. "सध्या एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल.
 
लोकशाहीचा विजय. आणि निकाल विरोधात गेला तर ईव्हीएम, निवडणूक आयोग, लोकशाहीचा खून असे म्हटले जातं. जे संविधान घेऊन आपण फिरतो, त्या संविधानावर दाखवलेला हा अविश्वास आहे.या संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर अविश्वास तयार करण्यासारखा हा प्रकार आहे”, असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाविरोधात जनमत तयार करणं हा राजद्रोह असल्याचे मत मांडले.
 
यासाठी त्यांनी "सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देताना, राजद्रोहाचा अर्थ अर्थ समजवून सांगितला. संविधानानं ज्या संस्था तयार केल्या आहेत, त्यांच्याविरुद्ध जनमत तयार करणे, हा राजद्रोह असल्याचे म्हटले आहे मात्र आज आपण रोज ते काम करत आहोत. हे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने बाजूने निकाल दिला तर सर्व काही ठीक आहे, पण विरोधात निकाल दिला तर विरोध सुरू होतो.
 
विरोधकांनी आता संविधान आणि जनतेचा आदर करत जनादेश स्वीकारावा, असे फडणवीस म्हणाले. यानंतर त्यांनी गालिबच्या कविता वाचून विरोधकांना आरसा दाखवला. फडणवीस म्हणाले, "ग़ालिब ताउम्र ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और वो शीशा पोछते रहे....;; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घणाघाती आरोप केले. मुख्यमंत्री म्हणाले, "ईव्हीएम काढा रॅली काढण्यात आली.
 
यामध्ये मुख्य वक्ते महमूद प्राचा हे होते ज्यांनी न्यायालयात दहशतवाद्यांची वकिली केली होती. निवडणूक जिंकण्यासाठी काय काय नाही केले. महाराष्ट्रात निवडणूकीत वोट जिहादचा नारा देण्यात आला. उलेमा बोर्डाने १७ कलमी मागण्या मांडल्या आणि काँग्रेसने त्यावर मौन बाळगले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध विषयांना हात घातला.
लाडकी बहीण योजनेत बदल नाही...
लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित करण्यात येणार्‍या शंका मुख्यमंत्र्यांनी यावेळी फेटाळून लावल्या. या सभागृहाला मी आश्वस्त करू इच्छितो की कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, त्यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही.
 
ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवले, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबरचा हफ्ता त्यांच्या खात्यात आम्ही जमा करत आहोत. काहीच बदल नाहीये, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता तर सगळ्यांच्याच खात्यात आम्ही पैसे टाकत आहोत. एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कुणी वापरत असेल, तर तो जनतेचा पैसा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे ही तुमची आमची सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
 
कारण आम्हाला मागे कळले की माणसानेच ९ खाती उघडली. त्यामुळे त्याला लाडकी बहीण म्हणायचे कसे? बरं लाडका भाऊही म्हणू शकत नाही. बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? अशा शब्दांत योजनेचा गैरवापर करणार्‍यांनाही देवेंद्र फडणवीसांनी सूचक इशारा यावेळी दिला.
Powered By Sangraha 9.0