15 रुपयांच्या वडापावने वाचवले लाखमोलाचे जीव

20 Dec 2024 18:09:02
 uran
 
उरण । मुंबईमधील गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात स्पीड बोटने फेरी बोटला धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या बोटीवरील 98 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून दुसर्‍या दिवशीही दोन बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु आहे. मात्र या बोट अपघातामध्ये मरण पावलेल्यांबरोबरच बचावलेल्या संदर्भातील धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच एक कुटुंब मुलाच्या हट्टापायी या अपघातातून वाचल्याची माहिती समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त बोटमधून अलिफंटाला जाण्यासाठी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील अंजली त्रिपाठी आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईमध्ये फिरण्यासाठी आले होते. हे सर्वजण नीलकमल फेरीबोटीमधून लेणी पाहण्यासाठी जाणार होते. संपूर्ण कुटुंबाने या फेरीबोटची तिकीटं देखील काढली होती. ते बोटीमध्ये चढण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ पोहचलेही होते. मात्र ते बोटीत चढणार इतक्यात त्यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांनी मुंबईचा वडापाव खाण्याचा हट्ट धरला.
 
अन्? संपूर्ण कुटुंब वाचलं. चिमुकल्यांना वडापाव खायचा होता म्हणून सर्वांनीच वडापाव खाण्याचं ठरवलं आणि ते गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर असलेल्या वडापावच्या गाडीवर वडापाव खाण्यासाठी थांबले. वडापावच्या या हट्टामुळे त्यांची फेरीबोट सुटली आणि त्यांच्यापैकी कोणीच या बोटवर चढू शकलं नाही. मुलांनी केलेल्या वडापावच्या हट्टामुळेच आमचं संपूर्ण कुटुंब या धक्कादायक अपघातामध्ये सापडलं नाही, असं अंजली त्रिपाठी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या 15 रुपयांच्या वडापावने त्रिपाठी कुटुंबातील लाखमोलाचे जीव वाचवले असेच या घटनाक्रमातून दिसून येत आहे
 
 
Powered By Sangraha 9.0