जिल्ह्यात चार्जिंग स्टेशन नसल्याने ‘शिवाई’ नाही , इतर जिल्ह्यातून बस फेर्‍या ; आरामदायी प्रवासाची रायगडकरांना प्रतिक्षा

21 Dec 2024 19:24:43
alibag
 
अलिबाग | राज्य परिवहन महामंडळाने ‘शिवाई’ बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. इलेक्ट्रीकवर चालणार्‍या शिवाई बस पर्यावरणपूरक आहेत, मात्र रायगड जिल्ह्यात एसटी विभागाकडे चार्जिंग स्टेशन नसल्याने एकाही आगारात शिवाई बस आलेली नाही. असे असले तरी शेजारी असलेल्या ठाणे जिल्ह्यातून बस फेर्‍या सुरु असून निवडक मार्गांवर सुविधा मिळत आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख मार्गांना आरामदायी बसमधून प्रवासाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
 
एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास समजला जातो. त्यामुळे प्रवाशांची प्रवासासाठी पहिली पसंती ही एसटी बसला असते. प्रवाशांसाठी ई-बसमुळे बसचा प्रवास हा ध्वनी-वायू प्रदूषणमुक्त होणार आहे. वृद्धांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, तसेच महिलांपासून शाळकरी मुलींपर्यंत सर्वांनाच एसटी प्रवासात सवलत मिळत असल्याने एसटीची ‘लालपरी’सर्वांमध्ये लोकप्रिय आहे. जिल्ह्यात महामंडळाचे आठ आगार आहेत.
 
यात अलिबाग, महाड, पेण, माणगाव, श्रीवर्धन, कर्जत, रोहा आणि मुरूड यांचा समावेश आहे. मात्र, एकाही आगारात शिवाई बस आलेली नाही. जिल्ह्यात चार्जिंग स्टेशन नसल्याने अद्याप एकही शिवाई बसेस रायगड विभागाला मिळाली नाही. रायगड जिल्हयात अलिबाग आणि महाड आगारात सुरूवातीला चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावर अद्याप काम सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात शिवाई बसेस उपलब्ध झाल्या नसल्या तरी इतर जिल्हयातून बससेवा सुरू आहे.
 
ठाणे आगारातून ठाणे ते अलिबाग मार्गावर दिवसाला शिवाई बसच्या आठ फेर्‍या सुरू आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जिल्ह्यात २०० हून अधिक बसेस महामंडळाकडे आहेत. मात्र, यातील बहुतांश बस नादुरुस्त आणि कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना घेऊन जाताना अनेक बस रस्त्यावरच बंद पडतात नव्या बसेसची मागणी केली, मात्र त्याही मिळाल्या नसल्याने आहे त्यातच प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.
 
जिल्ह्यात वातानुकूलित शिवशाही बसेसच्या फेर्‍या सुरू असतात. परंतु त्या धोकादायक तर आहेतच; शिवाय अनेक बस नादुरूस्त असून वातानुकूलित यंत्रणा बंद किंवा कमकुवत झाली आहे. त्यामुळे शिवशाहीच्या प्रवासाला रायगडकर वैतागले आहेत. शिवाई ही इलेक्ट्रीकवर चालणारी बस राज्य परिवहन महामंडळाने आणली आहे. पर्यावरणपूरक बस असल्याने आरामदायी आणि वातानुकूलित आहेत.
रायगड विभागातील एकाही आगारात चार्जिंग स्टेशन नाही. त्यामुळे शिवाई बस उपलब्ध झाल्या नाहीत. महाड आणि अलिबाग आगारात लवकरच चार्जिंग स्टेशन्स उभारले जातील. त्यानंतर जिल्ह्याला शिवाई बस उपलब्ध होतील. - दीपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड
Powered By Sangraha 9.0