मुरुड समुद्रकिनारी पर्यटन महोत्सव निश्चित नाही , हॉटेल व्यावसायिक चिंतेत; नाताळची सुट्टी असून रुमची बुकिंग मिळत नाही

23 Dec 2024 20:12:31
 Murud
 
मुरुड जंजिरा । मुरुडच्या विशाल सुंदर समुद्रकिनारी गेली 20 वर्षे पर्यटन महोत्सव भावण्यात येतो. अनेक वर्षे याचे नियोजन नगरपालिका करते. सध्या नगरपालिकेत नगरसेवक नसल्याने व मुख्यअधकारी नवीन आल्याने ह्यावर्षी पर्यटन महोत्सव 2024 होणार की नाही? याची निश्चिती नसल्याने मुरुडच्या हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहे. पर्यटन महोत्सव ही मुरुडची शान आहे. दरवर्षी समुद्रात वाळूत 60 फुटी स्टेज बांधून सुंदर अशा लाटांच्या आवाजात सायंकाळच्या सप्तरंगी प्रकाशात या महोत्सवाची सुरुवात होते.
 
25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रम असल्याने महाराष्ट्रातून पर्यटक खास या दिवसांत मुरुडला येतात, पण यावर्षी पर्यटक महोत्सव नसल्याने अ‍ॅडव्हान्स बुकींग झाली नसल्याचे असे हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत. गेल्यावर्षी आमदार महेंद्र दळवी यांनी स्वखर्चाने पर्यटन महोत्सवाचे नियोजन केले होते. शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील आणि सहकार्‍यांनी महोत्सवाचे अतिशय सुंदर नियोजन केले होते.
 
यावेळी आमदार मुरुडला येताच तातडीने निर्णय घेऊन महोत्सव करण्याचा मानस असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. मुरुडला समुद्राच्या लाटांचा आनंद व शिवरायांचे जलदुर्ग पाहण्यासाठी खास येतो. समुद्रकिनारी असणारे हॉटेल व्यावसायिकांनी चंगली सेवा देऊन पर्यटकांना खूश केले. पर्यटकांची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबी यावर नाताळ सुटीत खूप ताव मारणार व वर्षभर पुरेल एवढे ताजे कोळंबीचे सोडे मोठ्या प्रमाणात तयार आहेत.
 
मुरुड व राजपुरी येथील सोडे प्रसिद्ध आहेत. कोणताही वाईस वास न येणारे सोडे फक्त मुरुडला मिळतात. मुरुड समुद्रकिनारी सुशोभिकरण झाल्याने उत्तम पार्किंगची सोय झाली हंगामात 400 पर्यटकांची वाहने समुद्रकिनारी पार्कींग झाल्याने पर्यटकपर्यटनाचा खरा आनंद घेऊ शकले. सुक्या मासळीला मागणी वाढली आहे.
 
ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुरमई, हलवा, बोंबील, अंबाडी सुकट, पांढरी सुकट कोळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सुकवली व दिवाळीसाठी साठवली. पर्यटकांची चांगली साथ मिळाल्याने साठवलेला सगळा माल संपला. कोळी महिलांची अनेक वर्षांची मागणी आहे की मासळी सुकवण्यासाठी समुद्रकिनारी काँक्रीटचे ग्राऊंड पाहिजे. जेणेकरुन सुकलेल्या मासळीला स्वच्छ करणे सोपे जाते व मासळीचा दर्जा उत्तम होतो. अशा सर्व आवडीच्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक महोत्सवानिमित्त येतात, म्हणून ह्यावर्षी महोत्सवाचे नियोजन होणे गरजेचे आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0