जंजिरा किल्ल्यात जाण्यार्‍या पर्यटकांची सुरक्षा रामभरोस , पुरातत्व खात्याची एनओसी मिळेना

23 Dec 2024 18:25:12
Murud
 
मुरुड । जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक मुरूडला येत असतात; पण हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना गेले कित्येक वर्षे कसरतच करावी लागत आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी किल्ल्याच्या मागील बाजूस ब्रेक वॉटर जेटी तयार करण्याचे काम सुरू केले होते; परंतु पुरातत्व विभागातर्फे नाहरकत न मिळाल्याने जेटीचे काम रखडलेे.
 
यामुळे पर्यटकांची कसरत थांबणार कधी? असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे येणार्‍या पर्यटकांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे दिसून येत आहे. मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथील जेटीवरुन शिडाच्या बोटीतून प्रवास करावा लागतो. या बोटींची शमता 30 ते 35 प्रवाशांची असताना सुमारे 50 त्यापेक्षा जास्त प्रवासी भरून नेत आहेत. या बोटीत कधीच पुरेसे लाईफ जॅकेट नसतात. अर्ध्यावर गेल्यावर बोटीत पर्यटकांची लुटालूट सुरू आहे.
 
अधिकृत गाईड नसताना गाईड असल्याचे सांगून वारेमाप पैसे उकळले जातात. त्यामुळे पर्यटक कमालीचे संतप्त झाले आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी लाँच सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक लाँचला त्यांच्या क्षमतेनुसार प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. काहींना 50 ते 55 प्रवासी क्षमता तर काहींना कमी काहींना अधिक परवानगी देण्यात आली आहे. किल्ल्यात गेल्यानंतर आत स्वच्छतागृह बंद अवस्थेत असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे महिलावर्गाला यांचा मोठा त्रास होतो.
Powered By Sangraha 9.0