रायगडचा पालकमंत्री कोण होणार ? भरत गोगावलेंना मिळाले रोजगार हमी...

23 Dec 2024 12:50:17
alibag
 
अलिबाग | जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ना. भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन मंत्रीपद तर अदिती तटकरे यांना पुन्हा एकदा महिला व बाल कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशन संपण्याच्या काही तास आधी मंत्रीपदाचे वाटप करण्यात आले. रायगड जिल्ह्याच्या वाट्याला दोन मंत्रीपदे आली आहेत. त्यामुळे मात्र आता रायगडचा पुढचा पालकमंत्री कोण? याची चर्चा सुरु झाली आहे. १५ डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्य मंत्र्यांचा समावेश होता. मात्र महायुतीचे खातेवाटप झाले नव्हते.
 
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात खाते वाटप होईल अशी चर्चा होती. मात्र पूर्ण अधिवेशन बिनखात्याचे पार पडले. शेवटच्या काही तासांत मंत्रीपदांचे वाटप करण्यात आले. गृहमंत्रालय हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृहनिर्माण तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी आली आहे. रायगडच्या मंत्री अदिती तटकरे यांना महिला व बाल कल्याण खाते देण्यात आले आहे.
 
तर शिवसेनेच्या भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अदिती तटकरे यांच्यासह भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात दोन मंत्री पदे आली असली तरी पालकमंत्री पद कोणाकडे जाते? याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासाठी रायगडचे पालकमंत्रीपद किती महत्वाचे आहे? हे सर्वश्रृत आहे. २०१९ ला अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळाले होते.
 
त्यानंतर शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. रायगडात तीन आमदार शिवसेनेचे असताना राष्ट्रवादील पालकमंत्री पद का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र तेव्हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तिकडे कानाडोळा केला. पुढे या तिन्ही आमदारांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जाणे पसंत केले होते. तिथे गेल्यानंतरही पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला अर्थात अदिती तटकरे यांना मिळू नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
 
शेवटी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेच रायगडचेही पालकमंत्रीपद देण्यात आले. पालकमंत्रीपद शिवसेनेकडे राहिले. पण भरत गोगावले ना मंत्री झाले, ना पालकमंत्री. २०२४ च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भरत गोगावले आता मंत्री झाले आहेत. त्यामुळे आधीप्रमाणेच पालकमंत्रीपद शिवसेनेकडे अर्थात भरतशेठकडे यावे, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.
 
दुसरीकडे अदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण मंत्रीपद मिळाले आहे. त्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत स्वः ता जाहिरपणे कुठलाही दावा केलेले नाही. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळावे असे म्हटले आहे. शेवटी पालकमंत्री कोण असावा? याबाबतचा निर्णय महाआघाडीचे तीन नेते ठरविणार आहेत; मात्र अदितीताईंचे पालकमंत्री म्हणून याआधीचांगले काम आहे. त्यांना पालकमंत्रीपद देवून त्यांचा सन्मान करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्री कोण होणार अदिती तटकरे की भरत गोगावले? याकडे सर्वाचेच लक्ष आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0