पालीकरांच्या समस्यांना कोण देणार न्याय ? तक्रारींना फक्त आश्वासनांची मलमपट्टी; उपाययोजना शून्य

23 Dec 2024 18:34:31
pali
 
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालीतील मुख्य समस्या म्हणजे पाणीपुरवठा आणि अवजड वाहतूक. अनेक नागरिकांनी या समस्यांबाबत तक्रारी दिल्या आहेत, परंतु अद्याप कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत.
 
पाली ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, परंतु समस्या ‘जैसे थे’ आहेत. पालीतील अरुंद रस्ते आणि रस्त्यांवर अवैध वाहनांची पार्किंग तसेच अवजड वाहतूक यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी आणि वयोवृद्ध पादचारी यांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे. याबाबत पाली नगरपंचायतीला वारंवार तक्रारी देऊनही यावर कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. पालीच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बहुतेक ठिकाणी बंद आहेत.
 
वेळेवर देखभाल न झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. याबाबत नागरिकांनी नगरपंचायतीकडे तक्रार केली होती, परंतु अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. पाली शहरातील एकेरी वाहतूक बाबत कोणताही आराखडा नसल्याने सतत वाहतूक कोंडी होत आहे. एकेरी वाहतुकीच्या समस्यांवर कोणतीही उपाययोजना झालेली नाही, त्यामुळे शहरात सतत वाहतूक कोंडी होत आहे. पाली नगरपंचायतीकडून तक्रारींना फक्त आश्वासन दिली जात आहेत, परंतु प्रत्यक्षात कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नसल्याचे चित्र पाली शहरात पहावयास मिळत आहे.
 
पाली शहरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची अवैध पार्किंग केली जात आहे. जर एखाद्या नागरिकाला आपला जीव गमवावा लागला तर याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या सर्व समस्यांची गंभीरपणे दखल घेऊन पाली नगरपंचायत आणि मुख्य अधिकारी यावर उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालीतील नागरिकांना या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी त्वरित उपाययोजना होणे आवश्यक आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0