रायगड जिल्ह्यात भाजप सदस्य नोंदणीचा शुभारंभ

26 Dec 2024 19:32:11
panvel
 
पनवेल | भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार दर सहा वर्षांनी आपली सदस्यत्वता नुतनीकरण करण्यात येते. त्यानुसार भाजपने संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील नोंदणी अभियानाचा औपचारिक शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सदस्य नोंदणीने झाला. नागपूर येथे भाजपा प्रदेश बैठक आणि सदस्य नोंदणी कार्यशाळा नुकताच संपन्न झाली होती.
 
या कार्यशाळेनंतर जिल्हा आणि मंडलांच्या कार्यशाळासुद्धा घेण्याच्या सूचना प्रदेश बैठकीत करण्यात आली. त्याअनुषंगाने उत्तर रायगड जिल्ह्याची सदस्य नोंदणी कार्यशाळा पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडली. भारतीय जनता पार्टीच्यावतीने संघटन पर्व २०२४ सदस्यता अभियान आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार रायगड जिल्हा भाजपने हे अभियान यशस्वी करण्यासाठी संघटनात्मक नियोजन केले आहे.
 
या कार्यशाळेला ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय केळकर, पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुण भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहरे, चारुशीला घरत, उपाध्यक्ष जयंत पगडे, वसंत भोईर, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा मोर्चाचे मयुरेश नेतकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या माध्यमातून भाजपाच्या विचारधारेचे प्रचार आणि सदस्य वाढीसाठी एक मोठे पाऊल पडले आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि ऊर्जा युक्त वातावरण निर्मिती झाली आहे. भविष्यातील लोककल्याणकारी कार्यासाठी भाजपाच्या संघटनात्मक दृष्टिकोनाला अधिक बल देणारा हा कार्यक्रम होता.
 
मोबाईलवर मिस्ड कॉल करून सदस्यत्व घेता येणार आहे. संघटनात्मक जबाबदारी घेऊन काम करणार्‍यांना वैयक्तिक कमीत कमी दोनशे प्राथमिक सदस्य करणे आवश्यक आहे. भाजपचे सदस्यत्व मिळण्यासाठी ८८०००२०२४ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर एक मेसेज प्राप्त होईल. ज्यामध्ये प्राथमिक सदस्यत्व नोंदणी क्रमांक दिला जाणार असून राज्यात एक कोटी ५१ लाख प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात सदस्य नोंदणीला वेग आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0