खोपोली | टँकरला अपघात,रसायन गळतीने भीषण आग

26 Dec 2024 19:15:28
khopoli
 
खोपोली | मुंबईकडे निघालेल्या भरधाव टँकर चालकाने खोपोली शिळफाटा येथे एका विद्युत वाहिनीच्या डीपीला धडक दिल्याने टँकर पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधील केमिकलने पेट घेतला. त्यामुळे टँकरला भीषण आग लागली. चालक आणि क्लिनरने उडी मारल्याने ते दोघेही सुखरुप आहेत.
 
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून केमिकलने भरलेला टँकर मुंबईकडे निघाला होता. बोरघाटातून उतरून शिळफाट्याच्या काही अंतरावर आला असता ब्रेक न लागल्याने टँकर चालकाने विद्युत वाहिनीच्या डीपीला जोरदार धडक दिली आणि टँकर पलटी झाला.
 
या अपघातानंतर टँकरमधील रसायन रस्त्याशेजारील गटारातून वाहत साधारणतः ५०० मीटर अंतरावर गेले आणि भीषण आग लागली. या आगीत रस्त्यावरील एक कारदेखील जळाल्याची माहिती आली आहे. ही घटना बुधवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. टँकरमधून वाहणारे रसायन पेटत पसरत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.
 
या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले. आग विझविण्यासाठी खोपोली नगरपालिका, टाटा स्टील, आलाना कंपनी, जेएसडब्ल्यू, गोदरेज आयआरबी, एमएसआरडीसी देवदूत यंत्रणा या कंपन्यांच्या फायर ब्रिगेड टीमने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
 
खोपोली पोलिस, अपघातग्रस्त टिमने रस्त्यावर माती टाकली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे केमिकल एक्सपर्ट आणि टीमनेही केमिकलची तिव्रता पाहून आग विझविण्यासाठीचे मार्गदर्शन केले. तहसिलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
 
 
Powered By Sangraha 9.0