पेण-खोपोली महामार्गावरील अनधिकृत अवजड वाहने हटवली

27 Dec 2024 17:27:50
pen
 
पेण | पेण-खोपोली महामार्गावरील तरणखोप बायपास येथे मोठ्या प्रमाणात अवजड अनधिकृत पार्किंग केलेल्या गाड्यांबाबत ‘रायगड टाइम्स’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी तरणखोप येथील बायपासवर उभ्या असणार्‍या अनधिकृत अवजड वाहनांना हटवून सदर रस्ता मोकळा केला आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिकार्‍यांनी आम्हीदेखील रस्ता मोकळा करण्यासंदर्भात परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले आहे.
 
पेण-खोपोली रस्ता आणि मुंबई-गोवा हायवे आत्ता कुठे पेणकरांसाठी बर्‍यापैकी वाहतुकीस लायक ठरत आहे. त्यातच अशा प्रकारची अवजड वाहने रस्त्यालगत उभी करुन हे वाहनचालक प्रवाशांचा प्रवास अवघड करत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा ही अवजड वाहने उभी केल्याने अपघातांची संख्या वाढली होती. त्यामुळे ही अनधिकृतपणे उभीअसणारी अवजड वाहने तेथून हटवणे ही काळाची गरज होऊन बसली होती.
 
‘रायगड टाइम्स’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर परिवहन खात्याने तातडीने अंमलबजावणी करून ही वाहने हटवली आहेत. रायगड परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी दिलेल्या माहितीनुसार तेथील लोकल ट्रान्सपोर्टरना पार्किंग न करण्यास सांगितलेअसून पेट्रोल पंपमालक, गॅरेज मालक आणि टायर रिपेअर मालक यांना ट्रक पार्किंग न करण्याबद्दल सूचना देण्यात आल्या.
 
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी देखील आम्ही यापूर्वीच परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांना पत्रव्यवहार केला असून तरणखोप, धावटे, रानसई, अजीवली होराळे, डोणवत, तांबाटी, निफाण आदी ठिकाणी असणारी आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अवजड वाहने हटविण्याच्या मागणीचे पत्र दिले असल्याचे सांगितले.
वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या ठिकाणी वेळोवेळी पाहणी करून जी अनधिकृत वाहने या ठिकाणी पार्क केली असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देत आहोत. - सोमनाथ लांडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग
Powered By Sangraha 9.0