अलिबाग | रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन कुठलाही संघर्ष नाही, कार्यकर्त्यांना वाटत असते; पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असेल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात चढाओढ पहायला मिळत आहे. गुरुवारी, २७ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांबाबत घेतलेल्या आढाव्याची माहिती दिली. यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना चांगलेच टोलवले. राज्यात महायुतीला पूर्ण बहुमत असतानाही, मंत्रीपदे वाटप, खाते वाटपव्हायला उशिर लागला. आता राज्यात अनेक ठिकाणी पालकमंत्रीपदावरुन खेचाखेच आहे.
रायगडातही तो वाद दिसत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय घटक पक्षांना मान्य असतील. ते योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.
जिल्ह्यात महायुती एकत्र लढणार का?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला काही कालावधी आहे; कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे. ती याचिका निकाली निघाली आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला की याबाबत राज्यपातळीवर आम्ही ठरवू असे खा. तटकरे यांनी म्हटले आहे. तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी राजकीय परिस्थिती राहू शकते, अशा वेळेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी स्वतः आणि महायुतीचे नेते मिळून निर्णय घेवू. या निवडणूकाही एकत्र लढण्याचा प्रयत्न असेल असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
तटकरेंवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार नाराज?
वधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांसोबत सुनील तटकरे यांनी दगाफटका केल्याचा आरोप होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, माझ्यापर्यंत कोणी काही बोललेले नाही, असे उत्तर सुनील तटकरे यांनी दिले. माझ्या लोकसभा मतदारसंघातील चारही आमदारांचे राष्ट्रवादीने मनपासून काम केले आहे.
यानंतर कोणाच्या मनात काही शंका असेल, तर चर्चा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या चाळीस वर्षातील रायगड जिल्ह्यातील अनेक राजकीय चढउतार मी पाहिलेले आहेत. अनुभवलेले आहेत. त्या संघर्षाला तोंडही दिलेले आहे. आता राज्य पातळीवर मी पक्षाचा प्रमुख आहे. देशपातळीवर एनडीएचा घटक म्हणून माझ्याकडे पाहिले जात आहे.
अशावेळी इतक्या खाली येऊन कोणाच्या बाबतीत राजकारण करण्याचे कारण नाही. माझे मन मोठे आहे, मोठ्या मनानेच त्यांना सहकार्य करत राहीन, असेही त्यांनी म्हटले आहे. १५ वर्षे मी मंत्री म्हणून काम केले आहे. पालकमंत्री राहिलो आहे. दोन वेळा लोकसभेला निवडून आलो आहे.
आपल्या नेत्याला पालकमंत्रीपद मिळावे असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असते. तसे वाटणे स्वाभाविक आहे. त्यात दोष देण्याचे कारण नाही. मात्र ज्यावेळी निर्णय होईल त्यादिवशी ते सर्व संपेल. सर्वांना सोबत घेवून काम सुरु होईल. पुनःश्च हरीओम अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हर्षल पाटील, अमित नाईक, चारु मगर, तालुकाध्यक्ष जयंद्र भगत, मनोज भगत, ॠषिकांत भगत, पेणचे दयानंद भगत, आदी उपस्थित होते.