नवी मुंबई | शहराचे विद्रुपीकरण करणार्या शहरातील बेकायदा जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनरवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. तसा इशारा नवी मुंबई महानगरपालिकेने दिला असून, तक्रार करता यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तक्रार निवारण प्रणालीही कार्यरत आहे. दरम्यान, होर्डिंग, बॅनर, फलक लावण्याआधी संबंधितांना रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.
उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ प्रकरणी पारित केलेल्या ३१ जानेवारी २०१७ व १९ डिसेंबर २०२४ रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर यांच्यावर करण्यात आलेल्या व करण्यात येत असलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नवि-२ के. एच.गोविंदराज यांनी सर्व संबधित प्राधिकरणांची बैठक घेऊन मौलिक सूचना केल्या.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेत प्रधान सचिवांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे स्पष्ट निर्दे श दिले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर लावण्यासाठी महानगरपालिकेने जागा निश्चित केल्या असून त्याच जागांवर, विहित आकारमानात जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर प्रदर्शित केले जातील याची खात्री संबंधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी करुन घ्यावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
या फलकांवर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगीचे ठिकाण, परवानगीचा कालावधी हा फलकाच्या आकारासह व क्यू आर कोडसह नमूद असावा असे आयुक्तांनी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त आपल्या विभागीय क्षेत्रात कुठेही विनापरवानगी बॅनर लावले जाणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. विनापरवानगी फलक प्रदर्शित केलेला दिसल्यास त्यावर दंडात्मक व शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी असेही आयुक्तांनी स्पष्टपणे निर्देशित केले.
याबाबतच्या सूचना जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर छपाई करणार्या प्रिंटींग प्रेस यांनाही देण्यात याव्यात तसेच सर्व राजकीय पक्षांनी याबाबतचे हमीपत्र दाखल केलेले असल्याने नवी मुंबईतील सर्व राजकीय पक्ष प्रमुखांना याबाबत माहिती द्यावी असेही आयुक्तांनी सूचीत केले. या अनुषंगाने विभागनिहाय स्थापित समितीची बैठक घेण्यात यावी तसेच या विषयी नागरिकांना सुलभपणे तक्रार करता यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाालेपश्रळपश.लेा या संकेतस्थळावर तक्रार निवारण प्रणाली कार्यरत असल्याचीही प्रसिध्दी करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
ज्या नागरिक, संस्थांना जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर लावावयाचे असतील त्यांनी संबधित विभाग कार्यालयाची रितसर परवानगी घेऊन परवानगीत नमूद जागी व आकारात लावावेत असे आवाहन करतानाच याबाबत विनापरवानगी जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर लावलेले आढळल्यास त्यावर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ चे कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचीही नोंद घ्यावी, असे नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सूचित करण्यात येत आहे.