विज्ञान प्रदर्शनांमुळे खेड्यापाड्यातून शास्त्रज्ञ तयार होतील , आ. महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन

28 Dec 2024 17:57:44
 Murud
 
मुरुड-जंजिरा | आजच्या विद्यार्थ्यांमध्ये भरपूर बुद्धिमत्ता आहे. त्यामुळे शालेय विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण होऊन भविष्यात खेड्यापाड्यातून शास्त्रज्ञ निर्माण होतील आणि आपण विकासाचे अंतिम टोक गाठण्यात यशस्वी ठरणार आहोत. त्यामुळे शालेय जीवनातील विज्ञान प्रदर्शन खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आमदार दळवी यांनी केले आहे. पंचायत समिती मुरुड आणि जिंदाल विद्यामंदिर साळाव यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे तालुका विज्ञानप्रदर्शन मोठ्या दिमाखात संपन्न झाले.
 
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थी, शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी स्वयंचलित यंत्राच्या सहाय्याने शास्त्रज्ञांच्या प्रतिमेचे अनोख्या पद्धतीने अनावरण करुन उद्घाटन केले. यावेळी आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, जीवनात विविध प्रयोग करणे खूप आवश्यक आहे.
 
आम्हीसह राजकरणात विविध प्रयोग करून माणसाचा खरेपणा पारखून त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देत असतो. आगामी काळात ग्रामीण भागाच्या पाणी, रस्ते व त्याचबरोबर शाळा दुरुस्तीच्या कामाला प्रथम प्राधान्य देणार आहोत. मी आमदार झाल्यापासून शिक्षकांवर कोणताही दबाव नाही.
 
माझ्या काळात महिलांचा सन्मान निश्चितपणे राखला जाईल. गटशिक्षण अधिकारी गवळी यांनी उत्तमपणे विज्ञानप्रदर्शन सादर केले असून त्यांच्या कार्याची मी दखल घेणार आहे. नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, जिंदाल विद्यामंदिरचे प्राचार्य मुकेश ठाकूर, समाजसेवक भगीरथ पाटील यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. या प्रदर्शनात मुरुड तालुयातील विविध व्यवस्थापनांच्या एकशेवीसहून अधिक शाळा सहभागी झाल्या.
 
प्रदर्शनाच्या औचित्याने निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. इतर प्रमुख उपस्थितांमध्ये जिंदल विद्यामंदिरचे उपप्राचार्य मंगेश बामनोटे, कनिष्ठ विस्तार अधिकारी नरेंद्र गुरव, वळके केंद्रप्रमुख महेश कवळे, माजी पंचायत समिती यांसहित अन्य साधनव्यक्ती, तालुयातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक शाळाप्रमुख, शिक्षक, बालशास्त्रज्ञ, स्पर्धक विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0