अलिबाग | रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी प्रभावीपणे केली जात असल्याने गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत एड्स संसर्गाचे प्रमाण ०.३ टक्के खाली आल्याचे सकारात्मक चित्र आहे. लवकरच हे प्रमाण शून्य टक्क्यापर्यंत आणण्याचा मानस असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी सांगितले. एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रणासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात.
त्याअंतर्गत जिल्हा स्तरावर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालयामार्फत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रणासाठी वेगवेगळ्या सेवा कार्यरत आहे. सध्या जिल्ह्यात एचआयव्ही समुपदेशन व चाचणी करण्यासाठी एकूण १५ आयसीटीसी केंद्र कार्यरत आहेत. या आयसीटीसी केंद्रामध्ये प्रशिक्षित समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे१२६ पीपीपी, सीबीएस ६, प्राथमिक आरोग्य केंद्र, काही ग्रामीण रुग्णालये तसेच शहरी आरोग्य केंद्र अशी एकूण ७४ एफआयसीटीसी केंद्रे आहेत.
ज्या ठिकाणी एचाअयव्ही स्क्रीनिंगचे काम केले जाते व तेथे एचआयव्ही संसर्गित आढळून आल्यास त्यास खात्री करण्याकरिता आयसीटीसीकडे संदर्भित केले जाते. आयसीटीसी केंद्रामार्फत एचआयव्ही समुपदेशन, विशेषत व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडून आणण्यासाठी प्रबोधन केले जाते. त्याचप्रमाणे जे संसर्गित आढळले आहेत त्यांना एआरटी औषधोपचार तसेच मानसिक आधार देऊन आवश्यक असल्यास सामाजिक योजनांचा लाभ दिला जात आहे.
जिल्ह्यामध्ये २०१४-१५ मध्ये सामान्य रुग्णामध्ये एचआयव्ही संसर्गित असलेले प्रमाण ०.६८ टक्के होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये हे प्रमाण ०.२१ टक्क्यांवर आले आहे. सेवा केंद्रामधील वाढ, तपासणीच्या प्रमाणात वाढ व जनजागृती यामुळे हे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. सर्व स्तरावर गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी, समुपदेशन व निदान होत असल्यामुळे पॉझिटीव्हचे प्रमाण कमी झाले आहे. नवीन पिढीमध्ये एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये म्हणून ईएमटीसीटी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
आयसीटीसीबरोबरच त्वचा व गुप्तरोग केंद्र, एआरटी केंद्र, रक्त संक्रमण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असल्याचेही डॉ. अंबादास देवमाने यांनी सांगितले. जिल्ह्यात यावर्षी ऑक्टोबर-२०२४ पर्यंत ७ गरोदर माता एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळून आल्या आहे. त्या सर्वांवर एआरटी औषधोपचार सुरु आहेत.
काय सांगते जिल्ह्याची आकडेवारी...
रायगड जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षामध्ये ४१७ जण एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळून आले होते. २०१५-१६ मध्ये ३७४, २०१६-२०१७ मध्ये ४३७, २०१७-१८ मध्ये ४६०, २०१८-१९ मध्ये३९७, २०१९-२० मध्ये ३६१, २०२०-२१ मध्ये २३८, २०२१-२२ मध्ये २५७, २०२२-२३ मध्ये ३४४, २०२३-२४ मध्ये ३२३ तर २०२४- २०२५ या वर्षात ऑक्टोबर-२०२४ पर्यंत २०१ जण एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. एप्रिल २०१४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात ३ हजार ८०९ जण एचआयव्ही संसर्गित आढळून आहेत. यापैकी ३ हजार ३७१ संसर्गित रुग्ण एआरटी औषधोपचाराचा लाभ घेत आहेत.