कर्जत | खोपोली कर्जत मुरबाड शहापूर राष्ट्रीय महामार्ग ५४८अ वर कर्जत-मुरबाड भागातील वंजारवाडी पूल परिसरातील खड्डे वाहनचालक यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत. त्या पुलाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असून ते खड्डे राज्य रस्ते विकास महामंडळ हा बुजवत नाही? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. कर्जत तालुयातून जाणार्या शहापूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्गावर कर्जत तालुयातील वंजारवाडी येथील पेज नदीच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.
त्यात कर्जत दिशेकडे असलेले खड्डे हे लहान आकाराचे नाहीत तर अवजड वाहनांचे किमान एक चाक त्या खड्ड्यात अडकत आहे, एवढे मोठे खड्डे पडले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बनविण्यात आलेला हा रस्ता खड्ड्यांमध्ये हरवला आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग हा डांबरी आहे, त्यात त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या आदिवासी वाडीमधून पाण्याचे लोट येत आहेत. त्याचा परिणाम डांबरी रस्ता खराब होत असल्याचे बोलले जात आहे.
त्यात आदिवासी वाडीमधून येणारे सांडपाणी हे गटाराच्या सहाय्याने नदीपर्यंत नेले गेल्यास रस्ता खराब होण्याची अडचणी निर्माण होणार नाही. मात्र त्या भागातील रस्ता काँक्रीटचा तयार करण्याचे काम रस्ते विकास महामंडळ करीत नाही आणि त्याचवेळी रस्त्यामध्ये येणारे पाणी हे गटार बांधून अडविण्याचे काम रस्ते विकास महामंडळाकडून करीत नसल्याचे रस्ता खराब होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे.
कर्जत तालुका पर्यटन तालुका बनत असून कर्जत तालुयातील प्रदूषण मुक्त वातावरण आणि शुद्ध हवा यांचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुण्यावरून पर्यटक येत असतात. दुसरीकडे खराब रस्त्यामुळे पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होत आहे. दुसरीकडे कर्जत तालुयातून जाणारा हा महत्वाचा रस्ता खड्डेमय असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर असलेले खड्डे कर्जत तालुयातील दळणवळणास अडचणीचे ठरत असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.