अलिबाग | कोकणातील पर्यावरण संवर्धनासाठी आशुतोष जोशी हा उच्चशिक्षित तरुण पुढे सरसावला आहे. रायगडमधून त्याने कोकण पदयात्रेला सुरुवात केली आहे. पर्यावरण जनजागृतीसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यातील गावागावात पोहोचण्याचा त्याचा मानस आहे. आशुतोष याने इंग्लडमधील विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे.
मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने गावातच स्थायिक होऊन कोकण संवर्धनासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. याच हेतूने आशुतोष याने कोकण पदयात्रेची सुरुवात केली आहे. २४ नोव्हेंबरपासून रायगड जिल्ह्यातील रेवस येथून त्याने या पदयात्रेला सुरूवात केली आहे. यादरम्यान गावागावात जाऊन तो ग्रामस्थांशी संवाद साधत आहे. वाढत्या शहरी कारणामुळे निर्माण होणारे प्रश्न, येथील परिस्थितीचा अभ्यास तो करणार आहे.
लोकांना जल, जंगल आणि जमीन संवर्धनासाठी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व किनारपट्टीलगतच्या गावांना आशुतोष भेट देणार आहे. दररोज दहा ते पंधरा किलोमीटर चालण्याचे उद्दीष्ट त्याने समोर ठेवले आहे. यापूर्वी चिपळूण ते विशाखापट्टन्म अशी पदयात्रा केली होती.
१८०० किलोमीटर लांबीची ही पदयात्रा त्यांनी ६७ दिवसांत पूर्ण केली होती. यावेळी आलेल्या अनुभवांवर आधारीत ‘जर्नी टू द ईस्ट’ असे पुस्तकही लिहिले होते. याच पदयात्रेतील अनुभवानंतर आशुतोष याने कोकण पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई गोवा महामार्ग, रेवस रेड्डी सागरी महामार्ग आणि आता ग्रीन फिल्ड द्रुतगती महामार्ग असे तीन महामार्ग कोकणात होऊ घातले आहेत.
मात्र महामार्गांच्या उभारणीसाठी येथील पर्यावरणाचा बळी दिला जाणार आहे. दुसरीकडे उद्योगांच्या नावाखाली रासायनिक प्रकल्प कोकणावर लादले जात आहेत. ज्या रासायनिक प्रकल्पांमुळे येथील नद्या, हवा आणि जमिन प्रदुषित होणार आहे. प्रकल्पांच्या नावाखाली शेतकर्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. शेती करणारे शेतकरी आज भूमीहीन होऊन देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे कोकणाला औद्योगिक विकासाची गरज नाही. तर पर्यावरणपूरक, पर्यटन व्यवसायाची गरज आहे असे आशुतोष याने सांगितले.