महाड | रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यात नुकतीच घडली आहे. संतोष दगडू जाधव (वय ४०) असे मृताचे नाव असून ते पोलादपूर तालुक्यातील कामथे पो. बोरघर येथील रहिवासी होते.
२५ डिसेंबर रोजी ते मोटारसायकलवरुन भरधाव वेगात महाड दापोली मार्गावरुन महाडकडून दापोलीच्या दिशेने जात होते. दुपारी २.१० वाजण्याच्या सुमारास आमशेत बस स्टॉपजवळ त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते जोरात रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला धडकले.
यामध्ये संतोष यांस गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.