पोलादपूर | पोलादपूर तालुक्याची उत्तरवाहिनी असणार्या सावित्री नदीपात्रात पोलादपूर शहरातून गोळा केलेला कचरा टाकण्याचे कृत्य हे राजरोसपणे सुरु आहे. त्यामुळे पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते दिलीप भागवत यांनी तीव्र आंदोलनाचा ईशारा लेखी पत्राद्वारे दिला आहे.
सावित्री नदीपात्राच्या तिरावर पोलादपूर शहर, चरई, काटेतळी या गावांच्या पाण्याची जॅकवेल असल्याने सावित्री नदीतून होणार्या पाणी पुरवठ्यातून या गावांना पाणी जात असते. मात्र सावित्री नदीत थेट टाकल्या जाणार्या कचर्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने पावसाळ्यात अनेक वेळा साथीच्या आजारांची साथ आल्याचे पाहावयास मिळते.
सरकारी नियमानुसार नदीपात्रापासून १०० मीटर अंतरावर व महामार्गपासून २०० मीटर अंतरावर डम्पिंग ग्राउंड करण्याला प्रतिबंद असताना देखील स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत डंम्पिंग ग्राउंड करण्यात आले आहे तर लेप्रसी रुग्णालयाच्या समोरील नदीपात्रात खुले आम कचरा टाकला जात आहे. शहरात मोकाट फिरणारी गुरे ही अनेक वेळा हा प्लॅस्टिक युक्त कचरा खात असल्याने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.