अलिबाग | जिल्हा रुग्णालय येथील अद्ययावत डायलेसिस व अपघात विभागाचे लोकार्पण मंगळवारी (३ डिसेंबर) आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी सर्वप्रथम आमदार दळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, हर्शल पाटील, शैलेश चव्हाण, अशरफ घट्टे, संपदा माळी, मनोहर पाटील, अॅड.मनमीत पाटील उपस्थित होते.
तसेच जिल्हा रुग्णालयातील अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे, कान, नाक, घसा तज्ञ डॉ.निशिकांत पाटील,प्रशासकीय अधिकारी डॉ. संगमेश्वर महाजन इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.आमदार दळवी यांच्या प्रयत्नातून जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस व अपघात विभाग अद्ययावत करण्यात आला असून आतापर्यंत डायलेसिस विभागात प्रतीदिन ३ शिफ्टमध्ये ७ मशिनच्या सहाय्याने ७४ रुग्ण उपचार घेत असून महिन्यामध्ये एकूण ६१८ डायलेसिस सत्र होत आहेत; परंतु आता त्यामध्ये आणखी ५ मशीनची वाढ झाल्यामुळे अधिकाधिक गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी आमदार दळवी यांचे विशेष आभार व्यक्त केले.
डायलेसिस रुग्णांना फिशुला व कॅथेटर बसविण्यासाठी मुंबई यथे जावे लागत होते याचा खर्चदेखील ५० ते ६० हजार इतका.रुग्णांना करावा लागत होता, परंतु आता जिल्हा रुग्णालयामध्ये या विषयाचे तज्ञ डॉ.अक्षय गुरसाळे हे प्रत्येक आठवड्यामध्ये येऊन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सेवा देत आहेत त्यामुळे रुग्णांचा आर्थिक व शारीरिक त्रास कमी झालेला आहे त्यांचे माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील १८ ते २० रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे.
आमदार दळवी यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून लवकरच ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे ५ बेडचे अद्ययावत डायलेसिस सेंटर सुरु केले जाणार आहे. याकरिता राज्य पातळीवर आमदार दळवी यांनी विशेष पाठपुरावा केलेला आहे. यामुळे अलिबाग, मुरुड रोहा येथील एकही गरजू रुग्ण डायलेसिस विना राहणार नाही तसेच प्रतीक्षेतही राहणार नाही. जिल्हा रुग्णालय येथे बर्याच कालावधीपासून इमारत दुरुस्तीच्या कामामुळे २ बेडचा अपघात विभाग होता.
परंतु जिल्हा रुग्णालयातील बेडच्या दृष्टीने अपघात विभाग मोठा असणे अपेक्षित असल्याने मा.आमदार महोदयांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अद्ययावत ५ बेडचा अपघात विभाग तयार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सर्व आधुनिक साधनसामुग्री उपलब्ध आहे तसेच अपघात विभागामध्ये २४×७ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका व इतर स्टाफ कार्यरत असणार आहेत.
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते शाम नंदी, शिवाजीनगर, अलिबाग, वृशेष म्हात्रे, व गीता पांडुरंग म्हात्रे, गोठवणे उरण या दिव्यांग व्यक्तीना दिव्यांग प्रमाणपत्र व दिव्यांग साहित्याचे वितरण केले. दरम्यान, लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे ३०० बेडचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्यात येईल व दीड वर्षामध्ये रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्यार असल्याचे आमदार दळवी यांनी म्हटले आहे. याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.